श्रुती झाली स्लिम !

Shruti Marathe

एकीकडे शारीरिक वजन या विषयावर मराठी टीव्ही वर्तुळात नवे शो दाखल होत आहेत. वाढतं वजन हा काही खट्टू होण्याचा विषय नाही तर स्थूल व्यक्तीच्या शरीरावर न जाता तिचे मन ओळखा, असे संदेश देणारे विषय मालिका, शो यामधून हाताळले जात आहेत. पण तरीही आपण स्लिम असावं असं प्रत्येक मुलीला वाटत असतं. अगदीच झिरो फिगर नाही कमावता आली तरी चवळीची शेंग अशी कमेंट मिळावी असं तर सेलिब्रिटी अभिनेत्रींना वाटत असतं. त्यामुळेच अभिनेत्री श्रुती मराठे हिनंही मनावर घेतलं आणि लॉकडाऊन काळात बऱ्याच मेहनतीनंतर ती स्लिम झाली आहे.

आता मला आनंदाने हसण्याचे कारण मिळाले, असं म्हणत नुकताच अभिनेत्री श्रुती मराठे हिने तिच्या सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून केवळ श्रुतीच नव्हे तर तिच्या चाहत्यांनाही प्रचंड आनंद झाला आहे. श्रुतीचा स्लिम लूक बघून तिने वजन कमी करण्यावर चांगलीच मेहनत घेतल्याचे दिसून येत आहे. अभिनय क्षेत्रात आल्यापासूनच श्रुती तशी शरीराने धट्टीकट्टी आहे. त्यात तिच्या अभिनयाची सुरुवात ‘इंदिर विळा’ या तमिळ सिनेमातून झाली असल्याने दाक्षिणात्य सिनेसृष्टीतल्या नायिका धष्टपुष्ट असल्याने तिच्या वाढत्या वजनाकडे कुणी बोट दाखवले नाही. तमिळ सिनेमासृष्टीत श्रुती मराठे ही ‘श्रुती प्रकाश’ या नावाने ओळखली जाते. जवळपास चार तमिळ आणि एक कन्नड सिनेमा झाल्यानंतर श्रुती मराठी सिनेमा, मालिकांकडे वळली.

आपल्या मराठी इंडस्ट्रीतील अभिनेत्री क्वचितच जाड आहेत. त्यामुळे श्रुतीलाही वजन कमी करून स्लिम व्हावं असं कधीपासून वाटत होतं. पण तिच्या विचाराला काही केल्या कृतीची जोड मिळत नव्हती. मध्यंतरी श्रुतीने साडीतले खूप सारे फोटो पोस्ट केले होते. या फोटोला सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी बारीक होण्याचा सल्लाही दिला होता. पण सिनेमा, नाटक, मालिका, जाहिराती यामधून मनात असूनही श्रुतीला स्लिम होण्यासाठी वेळ काढणे शक्य नव्हते. श्रुतीने बिफोर आणि आफ्टर अशी कॅचलाईन देत तिचे वजन जास्त असतानाचे आणि आता स्लिम झाल्यानंतरचे फोटो शेअर करत ‘अखेर जमलं’ अशा शब्दांत आनंद व्यक्त केला आहे. श्रुती सांगते, मार्चपासून कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा रूटीन बदलून गेलं. घरीच असल्यानं सतत खाणं व्हायचं.

खरं तर मी तशी वजनाने जाड आहेच; पण लॉकडाऊनमध्ये खायचं आणि बसायचं या रूटीनमुळे वजन जास्तच वाढायला लागल्याचं मला लक्षात आलं. मग मात्र, मी डाएट आणि व्यायाम करायचं ठरवलं आणि आता वजनाच्या बाबतीत सत्तरीतून मी पन्नाशीच्या उंबरठ्यावर आले आहे. श्रुतीची ‘राधा ही बावरी’ ही मालिका खूप गाजली होती. त्यानंतर ‘तुझी माझी लव्हस्टोरी’ या मालिकेतही श्रुती दिसली होती. अभिनेता गौरव घाटणेकर याच्यासोबत तिच्या याच मालिकेत ओळख झाली आणि त्यांनी लग्न केलं. लग्नानंतरची पहिली दिवाळी, पाडवा, गुढीपाडव्या या सणांचे नटूनथटून फोटो श्रुतीने कायमच शेअर केले आहेत. लग्नबंबाळ, शुभलग्न सावधान या सिनेमात तिची सुबोध भावेसोबतही छान केमिस्ट्री जुळली होती. ‘जागो मोहन प्यारे’ या मालिकेत तिला कॉमेडीचा सूरही मिळाला.

‘सनई चौघडे’ या सिनेमातून ती मराठी इंडस्ट्रीकडे वळली. तमिळ सिनेमा इंडस्ट्रीत तिला हेमामालिनी म्हटले जाते. स्लिम झाल्यानंतर श्रुती अधिकच खुलून दिसत आहे. त्यासाठी तिने डाएटवर भर दिला असून वजन घटवण्यासाठी विशिष्ट व्यायाम करून तिने घाम गाळला आहे. तिच्या या स्लिम लूकवर तिचा नवरा गौरवही फिदा झाला आहे. वजनाने जास्त आणि जाड असलेल्या किंवा स्थूल आहेत म्हणून नाराज होणाऱ्या मुलींविषयी मला आदरच आहे; पण वजन कमी करण्यासाठी कशी मेहनत घ्यावी लागते हे अनुभवण्यासाठीच मी हे चॅलेंज घेतल्याचं श्रुती सांगते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER