श्रेयस अय्यर ठरु शकतो सर्वात तरुण विजेता कर्णधार

श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) 13 प्रयत्नात पहिल्यांदाच दिल्ली कॕपिटल्सला (Delhi Capitals) आयपीएलच्या (IPL) अंतिम फेरीत पोहचवून आधीच इतिहास घडवला आहे. आता विजेतेपदाच्या बाबतीतही तो यशस्वी ठरला तर तो आणखीन एक विक्रम करेल मात्र त्यासाठी त्याला आपलाच मूळ संघ मुंबई इंडियन्सला (MI) पराभूत करावे लागेल. योगायोगाने विजेतेपदाच्या यशासह श्रेयस जो विक्रम मोडणार आहे तो विक्रम मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्याच (Rohit Sharma) नावावर आहे.

काय आहे हा विक्रम…तर दिल्ली कॕपिटल्सचा संघ जर आयपीएल 2020 जिंकण्यात यशस्वी झाला तर श्रेयस अय्यर हा या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचा यशस्वी कर्णधार ठरेल. मंगळवार, 10 नोव्हेंबरला जेंव्हा अंतिम सामना होईल त्यादिवशी श्रेयसचे वय 25 वर्ष 339 दिवस असेल आणि यासह तो मुंबईच्या रोहित शर्माला मागे टाकेल.

मुंबई इंडियन्सचा संघ 2013 मध्ये पहिल्यांदा आयपीएल विजेता ठरला हौता त्यावेळी रोहित शर्मा कर्णधार होता आणि 26 वर्ष 26 दिवस वयात त्याने आयपीएल जिंकण्याचा पराक्रम केला होता. आता श्रेयस त्याच्यापेक्षा जवळपास दोन महिने कमी वयातच यश मिळवू शकतो.

आयपीएलमध्ये दिल्लीचा संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला आहे आणि या यशासह आधीच श्रेयसने दिल्लीसाठी इतिहास घडवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER