श्रेयाचे गॉगल कलेक्शन झक्कास

Shreya Bugde

कुणाला कशाचे कलेक्शन करण्याचे वेड असेल हे काही सांगता येत नाही. त्यात कलाकार मंडळी म्हटलं की मग अशा स्टाईलबाज गोष्टी तर त्यांच्या संग्रहात असायलाच पाहिजेत. अभिनेत्री श्रेया बुगडे हिच्याकडे कुठल्या अक्सेसरीजचे कलेक्शन आहे हे जर ऐकलं तर तुम्ही आश्चर्य व्यक्त कराल. श्रेया कुठे फिरायला जाते तिथे अर्थातच शॉपिंग करायला निघाली की ती येताना वेगवेगळ्या प्रकारचे गॉगल्स खरेदी करते आणि तिच्या गॉगलवेडामुळेच वेगवेगळ्या आकारांच्या, वेगळ्या कलरटोनच्या गॉगल्सच्या प्रचंड व्हरायटी तिच्या कलेक्शनमध्ये आहेत. हे सगळे गॉगल ती फक्त तिच्या कपाटामध्ये ठेवत नाही तर त्या त्या गॉगलला शोभणारे ड्रेसिंग करत फोटो काढण्याची हौसही भागवून घेते. श्रेयाच्या सोशल मीडिया पेजवर जर तुम्ही भटकंती केली तर तिच्या या गॉगल खजिन्याचा तुम्हाला नक्कीच प्रत्यय येईल.

‘चला हवा येऊ द्या’ या शोमधून कॉमेडीची क्वीन अशी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री श्रेया बुगडेला गॉगल्सचं प्रचंड वेड आहे. कुणाकडे फार तर तीन-चार गॉगल्स असू शकतात; पण सध्या श्रेयाकडे शंभराहून अधिक वेगवेगळ्या प्रकारचे गॉगल्स आहेत जे तिने कधी कामाच्या निमित्ताने किंवा भटकंतीच्या निमित्ताने वेगवेगळ्या शहरांतून खरेदी केले आहेत. इतकेच नव्हे तर त्यापैकी काही गॉगल्स ऑनलाईन शॉपिंग करून मागवले आहेत. कधीही मोबाईल बघत बसली आणि एखाद्या ऑनलाईन शॉपिंग साइटवर जर तिला वेगळ्याच प्रकारचा गॉगल नजरेस पडला की लगेच तिचा हात ते खरेदी करण्याच्या बटणावर क्लिक होतो. कधी एकदा तो खरेदी करते आणि डोळ्यांवर घालून फोटो काढते असे तिला होऊन जाते. श्रेयाच्या कलेक्शनमध्ये चौकोनी, गोल या नेहमीच्या आकारासोबत हार्ट शेप , त्रिकोण , लंबगोल अशा वेगवेगळ्या फ्रेमच्या आकाराचे गॉगल्स आहेत. कलर टोनबाबत तिला जरी ब्राऊन कलर आवडत असला तरी बॉटल ग्रीन , ग्रे , ब्लॅक मस्टर्ड यल्लो या वेगवेगळ्या ग्लास कलरचे गॉगल्स श्रेयाच्या संग्रहात आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी श्रेयाने घातलेल्या त्रिकोणी आकाराच्या फ्रेमचा गॉगल तुफान हिट झाला होता. तिच्या या गॉगल कलेक्शन आणि गॉगलमधल्या वेगवेगळ्या फोटोचे तिचे चाहते नेहमीच कौतुकही करत असतात आणि खूप छान कमेंट्स ही देत असतात. तिच्या अनोख्या छंदाबद्दल श्रेया सांगते की, प्रत्येक व्यक्तीला गॉगल घालायला आवडत असतो आणि इतकेच नव्हे तर प्रत्येकाच्या कलेक्शनमध्ये तीन-चार गॉगल्स तर नक्कीच असतात. मलाही अशीच गॉगलची आवड निर्माण झाली ती उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून किंवा कुठेही जाताना आपले डोळे सुरक्षित असावेत म्हणून. पण नंतर नंतर जेव्हा जेव्हा मी गॉगलची खरेदी करायला सुरुवात केली तेव्हा मला त्याच्या फ्रेममधले वैविध्य, त्याच्या रंगीत ग्लासचे वैविध्य आवडायला लागलं आणि आता असे झाले आहे की मी कुठेही फिरायला गेले की तिथे जेव्हा मार्केटमध्ये जाते तेव्हा सगळ्यात पहिली खरेदी ही माझी गॉगलची असते. माझ्याकडे जे गॉगल्स आहेत त्यामध्ये काही ग्लासचा रंग वेगळा आहे व कधी कधी त्याची जी फ्रेम आहे तिच्यावर काही वर्क केलेले गॉगल्स माझ्याकडे आहेत.

काही पांढऱ्या, गुलाबी, फ्रेमचे आहेत. जे मी नेहमी घालत नाही; पण कधी तरी फंकी लूक जर मला पाहिजे असेल तर मी घालते आणि फोटो काढते. श्रेयाचे गॉगलवेड जसे आहे तसेच तिला सेल्फी काढण्याची ही प्रचंड आवड आहे. तिच्या मैत्रिणी तिच्याबद्दल अशी गोड तक्रार करत असतात की जेव्हा श्रेया त्यांच्याबरोबर असते आणि ते धमाल करत असतात तेव्हा श्रेया सेल्फी काढण्यात दंग असते. आपण अनेकदा मालिकेमध्ये किंवा सिनेमांमध्ये असं सतत सेल्फी घेणारं पात्र बघत असतो तशीच तिला प्रचंड सेल्फी काढायला खूप आवडतं. जे काही बहुतांशी फोटो तिने सोशल मीडिया पेजवर शेअर केलेले आहेत त्यामध्ये तिने काढलेल्या सेल्फीची संख्या जास्त आहे. श्रेयाच्या शब्दात सांगायचं तर संग्रहात असलेल्या अनेक गॉगल्सपैकी सगळेच गॉगल्स ब्रांडेड किंवा खूप महाग आहेत असे नाही.

तर कधी कधी स्ट्रीट शॉपिंगमध्ये खरेदी केलेलेही आहेत. इतकंच नव्हे तर अनेकदा स्टेशन परिसरातील छोटी-छोटी दुकाने असतात तर तिथेसुद्धा श्रेयाला हटके गॉगल मिळालेले आहेत. आणि तिने ते खरेदी केलेले आहेत. त्यामुळे जरी श्रेयाच्या कलेक्शनमध्ये शंभराहून अधिक वेगळ्या प्रकारचे गॉगल्स असले तरी त्यासाठी तिने फार पैसे खर्च केले नाहीत . फक्त त्याचा कधी आकार श्रेयाला आवडतो तर कधी रंग आवडतो. कधी त्याच्यावर केलेलं कलाकुसरीचं काम आवडतं आणि त्यातूनच गॉगल खरेदी करते. शाळेत असताना खूप लाजाळू असलेली श्रेया मोठी झाल्यानंतर प्रत्येकाची फिरकी घेणारी कॉमेडी क्वीन होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं.

पण एकदा मावशीसोबत लोकलमधून प्रवास करत असताना तिने लोकलमधल्या काही महिलांचं निरीक्षण केलं आणि घरी आल्यानंतर मावशीला त्या महिलांची हुबेहूब नक्कल करून दाखवली. श्रेयाने जेव्हा ती मिमिक्री केली तेव्हा तिच्या मावशीने तू मोठी होऊन अभिनेत्री होशील असं गमतीनं म्हटलं होतं. मावशीचे ते बोल श्रेयाने खरे करून दाखवले. श्रेयाच्या अभिनयाची सुरुवात खरे तर गंभीर भूमिकांनी झाली; पण सध्या मात्र श्रेया विनोदी अभिनयातील बापमाणूस झाली आहे. तर अशा या श्रेयाचे असंख्य चाहते आहेत . ती मात्र वेगवेगळ्या प्रकारचे गॉगल्स खरेदी करण्याची चाहती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER