श्रेयाला आजही आठवतं ट्रेनमधलं गाणं

shreya bugde

विनोदी बुद्धी ही माणसामध्ये उपजतच असावी लागते. आपल्या आजूबाजूला काही मिस्कील माणसं असतात की, अगदी नेहमीच्या गप्पांमध्येसुद्धा आपल्याला भरभरून हसवतात. कधी कुणाच्या नकला करतील, कधी कोणाचा आवाज हुबेहूब काढतील. थोडक्यात काय तर, त्यांच्या असण्याने वातावरण कसे दिलखुलास होऊन जात असते. ‘चला हवा येऊ द्या’ या शोमधून प्रेक्षकांना भरभरून हसवणारी श्रेया बुगडे ही लहानपणी जेव्हा तिच्या मावशीसोबत ट्रेनमधून प्रवास करायची तेव्हा त्या ट्रेनमध्ये गाणी म्हणणाऱ्यांचा हुबेहूब आवाज काढून उपस्थितांना हसवायची. मोठी झाल्यानंतर श्रेया विनोदी अभिनेत्री होणार असं त्या वेळेला तिची मावशी बोलली होती. आज श्रेयाचा हसवेगिरीचा अंदाज पाहिला की श्रेयाला आजही ट्रेनमधलं गाणं आणि त्या गाण्याची कॉपी करतानाचा आवाज आठवला की, ती स्वतःही भरभरून हसते.

श्रेया बुगडे (Shreya Bugde) हे नाव ‘चला हवा येऊ द्या’ या शोमुळे जगभरात पोहचले आहे. छोट्या पडद्यावरील मालिकांमधील नायिका म्हणू नका किंवा राजकारणातील व्यक्तिरेखा म्हणू नका. या कुठल्याही भूमिकेत अगदी स्वतःला साच्यात बसल्याप्रमाणे बसवते. विनोदाचे अचूक टायमिंग साधलेल्या श्रेया बुगडेने ‘चला हवा येऊ द्या’ या शोमुळे विनोदी अभिनेत्री ही ओळख मिळवली आहे. अर्थात स्टॅंडिंग कॉमेडी करणे किंवा कॉमेडी स्किट सादर करणं हे काम सोपं नाही हेदेखील तितकंच खरं. श्रेयाला या सगळ्याची नस अचूक सापडली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ यासारख्या शोमधून जेव्हा ती लोटपोट हसवते तेव्हा तिच्या चाहत्यांना एक प्रश्न पडतो की, श्रेया लहानपणीदेखील अशीच विनोदवीर होती का? हा खुलासा एका मुलाखतीमध्ये तिच्या मावशीने केला. श्रेयाचा जन्म तिच्या मावशीच्या घरी म्हणजेच पुण्यात झाला. लहानपणापासून तिला मावशीची खूप सवय आहे.

श्रेया सांगते की, लहानपणी मी मावशीसोबत खूप प्रवास करायचे. मुंबईत ट्रेनमधून मावशीसोबतच फिरले आहे. ट्रेनमध्ये ठरावीक आवाजात गाणी गाणारे काही लोक येत असतात. ते गाणी म्हणतात आणि लोक त्यांना पैसे देतात. हे गाणारे लोक जरी वेगवेगळे असले तरी ट्रेनमध्ये म्हणायची गाणी टिपिकल असतात का, असा मला प्रश्न नेहमी पडायचा; कारण, हे भोळ्या शंकरा, तुम तो ठहरे परदेसी, परदेसी परदेसी जाना नही…  हीच गाणी नेहमी ऐकायला मिळायची. त्यांचा आवाज तसा चांगला असायचा नाही; पण गाण्याची पट्टी पकडताना इतकी वरचे पकडायचे की नंतर नंतर त्यांचा फुटलेला आवाज बघून खूप हसू यायचं. पण मला त्यांचं फार कौतुक वाटायचं. एकदा मावशीसमोर मी ट्रेनमधल्या गाण्याची हुबेहूब नक्कल केली तेव्हा मावशीनं  माझ्या आईला सांगितलं होतं, लोकांचे निरीक्षण करण्याची एक वेगळीच कमाल श्रेयामध्ये आहे. त्यामुळे भविष्यात ती नक्की अनेकांना हसवण्याचं  काम करेल. मावशीने सहज म्हटलेली ही वाक्ये  आज माझे  करिअर बघितले की, खरी ठरल्यासारखी  वाटतात.

विनोदी अभिनेते आतापर्यंत खूप होऊन गेले; मात्र विनोदी अभिनेत्री खूप मोजक्या आहेत. त्यातही अशा पद्धतीचा निखळ विनोद करत दिलखुलास हसवणाऱ्या अभिनेत्रींच्या पंक्तीत श्रेया बुगडेने नक्कीच वरचे स्थान निर्माण केले. ‘तू तिथे मी’ या मालिकेत श्रेया ही मिलिंद शिंदे या खलनायकाच्या पत्नीच्या भूमिकेत होती. रागीट पतीच्या दबावाखाली दबलेली बायको ही भूमिका श्रेयाने अत्यंत उत्कृष्ट निभावली होती. खरे तर ती भूमिका पाहिल्यानंतर कोणाच्या स्वप्नातही आलं नसतं की श्रेया विनोदी अभिनेत्री म्हणून लोकप्रिय ठरेल. पण श्रेया तिच्या अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याच्या एका टप्प्यापर्यंत अत्यंत गंभीर होती. तिने तोपर्यंत जी काही नाटकं सादर केली होती त्यामध्ये तिला खूप गंभीर स्वरूपाच्या भूमिका मिळाल्या होत्या. त्यामुळे तिला पुढच्या भूमिका येतानादेखील गंभीर स्वरूपाच्या आल्या.

‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये तिची एंट्री झाली आणि तिचं  गंभीर रूप कधी गळून पडलं हे तिचं तिलादेखील कळलं नाही. ‘चला हवा येऊ द्या’ या शोची टीम दीड वर्षापूर्वी परदेशात दौरे करण्यासाठी गेली होती. या परदेश दौऱ्यातही श्रेयाने अनेक स्किटमध्ये कमाल करत परदेशातील चाहत्यांचे प्रेम मिळवले आहे. याशिवाय ती सतत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह  असते. सोशल मीडिया पेजवरच तिने ट्रेनमधल्या गाण्याचा किस्सा शेअर केला. विनोदी अभिनेत्री म्हणून चाहत्यांची पसंती मिळत आहे त्याची नाळ कुठे तरी त्या ट्रेनमधल्या गाण्याची नक्कल करण्याशी जुळलेली आहे, असं तिला मनापासून वाटतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER