लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक

lenyadri

लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक हा अष्टविनायकापैकी सहावा गणपती. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या सहवासात कुकडी नदीच्या परिसरातील डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. येथे बौद्धांचे एक सुंदर लेणे आहे. त्यामुळे या डोंगरास लेण्याद्री म्हणतात. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे चारशे पायर्‍या आहेत. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक हा जुन्नरपासून सात किलोमिटर अंतरावर आहे. पुण्यापासून सुमारे 97 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.

shree girijatmak of lenyadri

पार्वतीने गजाननाने आपला पुत्र व्हावे यासाठी यासाठी लेण्याद्री पर्वताच्या गुफेत 12 वर्ष तपश्चर्या केली. तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन गजाननाने पार्वतीचा पुत्र होण्यास होकार दिला. त्यासोबतच तुझे आणि लोकांचे मनोरथ पूर्ण करेल असा वर दिला. भाद्रपद चतुर्थीला पार्वतीने गजाननाच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली. ती मूर्ती सचेतन होऊन पार्वतीपुढे पुत्ररुपाने प्रकट झाली. त्या बालकाला सहा हात, तीन नेत्र आणि सुंदर शरीर होते. गिरजात्मज विनायकाने या प्रदेशात 12 वर्षे तप केले. बाल्यावस्थेतच अनेक दैत्यांच्या संहार केला. याच प्रदेशात गौतममुनींनी गणेशाची मुंज केली. येथेच त्यांनी मयुरेश्वराचा अवतार घेतला अशीही आख्यायिका आहे. सुमारे 15 वर्षे या प्रदेशात गणेशाचे वास्तव्य होते. त्यामुळे हा प्रदेश पवित्र समजला जातो. या गणेशस्थानाच्या नावावरुनच लक्षात येते की हे मंदिर उंचावर असले पाहिजे. जवळपास पावणे तीनशेहून अधिक पायर्‍या चढून वर गेल्यानंतर लेण्याद्रीचे गिरिजात्मज गणेश मंदिर आहे.  हे डोंगरात कोरलेले विस्तीर्ण लेणेच आहे. मंदिर दक्षिणाभिमुख आहे. मंदिरासमोर सहा दगडी खांबांचे भव्य सभामंडप आहे. दगडात कोरलेल्या या मंदिरात जागोजागी विविध कोरीवकाम आपले लक्ष वेधून घेते.

गणेश मूर्ती लेण्यात दगडी भिंतीवर कोरलेली आहे. दगडाला शेंदूर फासून ठेवल्यासारखी ही मूर्ती दिसते. गिरिजात्मजाच्या उजव्या आणि डाव्या बाजूस हनुमान, गणपती आणि शिवशंकर विराजमान आहेत. भाद्रपद शुद्ध चतुर्थी आणि माघ शुद्ध चतुर्थी हे दोन मोठे उत्सव येथे असतात. माघी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. येथे भक्तांना जवळून गणरायाचे दर्शन घेता येते. विशेष म्हणजे गणरायाच्या अंगावर आभूषणे नाहीत. इथे जाण्यासाठी पुणे जिल्ह्यात लेण्याद्री हे गणेशस्थान आहे. पुणे आणि तळेगाव हे जवळचे रेल्वेस्टेशन आहे. जुन्नर हे जवळचे बसस्टँड आहे. लेण्याद्रीला जाण्यासाठी प्रथम जुन्नरला यावे लागते. पुण्याहून जुन्नरला एस.टी. बस आणि अथवा असतात. जुन्नरपासून लेण्याद्री सात किलोमीटर अंतरावर आहे.