श्रद्धा कपूर आता बनणार इच्छाधारी नागीण

Shrada Kapoor

बॉलिवूडमध्ये इच्छाधारी नाग आणि नागिणीच्या कथांना खूप मागणी असते. केवळ मोठ्या पडद्यावरच नाही तर छोट्या पडद्यावरही नागिणींनी धुमाकूळ घातलेला आहे. नागिण नावाच्या मालिकांचे शेकडो भाग आतापर्यंत प्रसारित झाले आहेत आणि अजूनही होत आहेत. प्रत्येक वेळी एक नवीन नायिका नागिणीच्या रूपात छोट्या पडद्यावर दिसते. मात्र मोठ्या पडद्यावर गेल्या अनेक वर्षात नायिकांनी नागिणीची भूमिका साकारलेली नाही. रीना रॉय, रेखा, श्रीदेवी यांनी पडद्यावर नागिणीनी जीवंत केले होते. याच यादीत आता श्रद्धा कपूरचे नावही जोडले जाणार आहे.

श्रद्धाच्या निमित्ताने बॉलिवूडमधील नाग-नागिणीच्या कथेवर आधारित चित्रपटांवर एक नजर टाकूया-

बॉलिवूडमध्ये सर्वप्रथम 1954 मध्ये इच्छाधारी नागिणीवर आधारित चित्रपट तयार झाला होता. या चित्रपटाचे नावच ‘नागिन’ होते. दिग्दर्शक नंदलाल जसवंत यांनी वैजयंती माला यांना इच्छाधारी नागिण बनवून या चित्रपटात सादर केले होते. चित्रपटाचा नायक होता प्रदीपकुमार. हा चित्रपट त्या काळात प्रचंड चालला होता. या चित्रपटातील मन डोले मेरा तन डोले हे गाणे आजही प्रचंड लोकप्रिय आहे.

यानंतर थेट 22 वर्षानंतर म्हणजे 1976 मध्ये पुन्हा एकदा ‘नागिन’ नावानेच चित्रपट तयार करण्यात आला होता. राजकुमार कोहली द्वारा दिग्दर्शित या चित्रपटात एका नागिणीने घेतलेला बदला दाखवण्यात आला होता. या चित्रपटात सुनील दत्त, फिरोज खान, विनोद मेहरा, जीतेंद्र, रेखा, मुमताज, रीना रॉय, योगिता बाली, संजय खान असे दिग्गज कलाकार होते. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालला होता.

त्यानंतर 2002 मध्ये याच कथेवर आधारित जानी दुश्मन चित्रपटाची निर्मितीही राजकुमार कोहली यांनी केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांचेच होते. त्यांचा मुलगा अरमान कोहली आण मनिषा कोईराला नाग आणि नागिणीच्या भूमिकेत होते. याशिवाय चित्रपटात अक्षय कुमार, सनी देओल, सुनील शेट्टी, सोनू निगम, आफताब शिवदासानी, अरशद वारसी, आदित्य पंचोली, रजत बेदी, शरद कपूर, अतुल अग्निहोत्री अशी कलाकारांची फौजही होती. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही चालला नाही.

1986 मध्ये दिग्दर्शक हरमेश मल्होत्रा यांनी सुंदर श्रीदेवीला नागिणीचे रूप देऊन नगीना नावाचा चित्रपट तयार केला. इच्छाधारी नागिणीच्या या कथेत ऋषी कपूर नायक तर अमरीश पुरी खलनायक होता. हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. एवढेच नव्हे तर नागिणीची कथा मांडणाऱ्या चित्रपटात हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो. या चित्रपटातील श्रीदेवीचा नागिण डांस आणि ‘मैं तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा’ हे गाणे आजही प्रचंड लोकप्रिय आहे.

हा चित्रपट हिट झाल्यानंतर याचा दुसरा भाग ‘निगाहें’ नावाने हरमेश मल्होत्रा घेऊन आले. यावेळी श्रीदेवीसोबत नायक म्हणून सनी देओलला घेण्यात आले होते. तर अमरीश पुरीच्या जागी अनुपम खेरला घेण्यात आले होते. परंतु हा चित्रपट नगिनाप्रमाणे बॉक्स ऑफिसवर चालला नाही.

याशिवाय 1989 मध्ये मंदाकिनीला नागिण बनवून ‘नाग-नागिन’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. या चित्रपटात मंदाकिनीचा नायक राजीव कपूरच होता. मात्र प्रेक्षकांना या दोघांची जोडी आणि चित्रपट जराही आवडला नव्हता. या चित्रपटाचे दिग्दर्शन रामकुमार बोहरा यांनी केले होते.

यावर्षीच मिनाक्षी शेषाद्रीला नागिण बनवून ‘नाचे नागिन गली गली’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात महाभारतात कृष्णाची भूमिका साकारणारा नितीश भारद्वाज नायक होता. हा चित्रपट प्रेक्षकांना बऱ्यापैकी आवडला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहन प्रकाश यांनी केले होते.

यानंतर रेखालाही पुन्हा एकदा नागिण बनावेसे वाटले आणि 1990 मध्ये ‘शेषनाग’ चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. रेखाने यात इच्छाधारी नागिणीचे भूमिका साकरील होती. नायक जीतेंद्र तर खलनायक होता डॅनी. अत्यंत खर्चिक हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नव्हता.

ताहिर हुसैन यांंनीही 1990 मध्ये आमिर खान आणि जुही चावला या सुपरहिट जोडीला घेऊन ‘तुम मेरे हो’ चित्रपट केला होता. हा चित्रपट सुपरफ्लॉप झाला होता.

याशिवाय पूजा बेदीने 1991 मध्ये आलेल्या विषकन्यात नागिणीची तर 2010 मध्ये मल्लिका शेरावतने हिस्समध्ये नागिणीची भूमिका साकारली होती.

आता या यादीत श्रद्धा कपूरचे नाव जोडले जाणार असून स्वतः श्रद्धानेच ट्विट करून ही माहिती दिली आहे. ट्विटमध्ये श्रद्धाने म्हटले आहे, स्क्रीनवर नागिनीची भूमिका साकारणे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. श्रीदेवीचे नगिना आणि निगाहे चित्रपट पाहून मी मोठी झाली आहे. ते चित्रपट पाहाताना भारतीय लोकपरंपरेशी जोडल्या गेलेल्या अशा कथानकात आपणही अशी भूमिका साकारावी असे मला वाटत असे.

श्रद्धा कपूर नागिनीची भूमिका साकारीत असलेल्या चित्रपटाची निर्मिती निखिल द्विवेदी करीत असून विशाल फूरिया दिग्दर्शन करणार आहे. श्रद्धाची नागिण प्रेक्षकांना किती आवडते ते चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER