अवैध प्रकरणावर कारवाई करू नये का? अनिल परब यांचा राज्यपालांना प्रश्न

Anil Parab & Bhagat Singh Koshyari

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) मुंबईतील कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने कारवाई केल्यानंतर कंगनाच्या समर्थनार्थ भाजप (BJP) नेत्यांनी आवाज उठवला. त्यासोबतच राज्यपाल भगसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनीही कंगनाचे समर्थन करत मुंबई महापालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. त्यावर शिवसेनेचे (Shivsena) नेते परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनीदेखील राज्यपालांना प्रश्न केला आहे. अवैध बांधकामांवर प्रश्न उपस्थित करू नये का, असा प्रश्न अनिल परब यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केला आहे.

तसेच, कंगना रणौतच्या कार्यालयावर कारवाई झाली असेल तर मग तिने केलेल्या बेकायदेशीर बांधकामाला भाजप, रिपाइं आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे समर्थन आहे का? असाही प्रश्न अनिल परब यांनी विचारला. “मुंबई महापालिकेचा कायदा काय आहे, ते बीएमसी कोर्टात सांगेल. जे  कोणी नियम फॉलो करणार नाहीत त्यांच्यावर  नियमाप्रमाणे कारवाई झाली पाहिजे. ज्यांचे बांधकाम अनधिकृत असेल, त्यांच्यावर कारवाई होईल.” असे अनिल परब यांनी स्पष्ट केले.

तसेच, “कंगनाच्या बेकायदेशीर बांधकामाला हात लावू नये, तिच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी होऊ नये, असं ज्यांना वाटते त्यांनी खुलेपणाने सांगावं. ” असं आव्हानही अनिल परब यांनी दिलं. दरम्यान, अनिल परब  म्हाडाच्या नोटीसबद्दल सांगताना  म्हणाले, “म्हाडाकडून आलेल्या नोटिशीबद्दल कालच समजलं. पण मी जागा मालक नाही, मी म्हाडाला विचारतोय की मला का नोटीस दिली? अनधिकृत असेल तर म्हाडाला कारवाई करण्याचा अधिकार आहे. याचा अभ्यास करावा लागेल.

म्हाडाने चुकीची नोटीस दिली आहे. पत्तेही चुकीचे टाकले गेले आहेत. हे सुडाचं राजकारण सुरू  झालं आहे. मंत्री म्हणून काम करतोय, म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.” असा दावाही परब यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER