भीती दाखविणा-या झुंडशाहीच्या पुढे नमते घेऊन टीकेचे धनी होणार काय? : अरुणा ढेरे यांचे आयोजकांना खडे बोल

aruna-dhere

यवतमाळ :- झुंडशाहीच्या बळावर जर कोणी आपल्याला भीती दाखवत असेल तर आपण नमते घेऊन टीकेचे धनी होणार काय ? असा सवाल उपस्थित करत ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करून संयोजकांकडून गंभीर चूक झाल्याची कबुली देत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी संमेलनाच्या आयोजकांना खडे बोल सुनावले. संमेलनात साहित्यबाह्य शक्तीच्या ताब्यात जाण्याचा धोका स्पष्ट असताना ती जोखीम समजशक्तीने उचलली गेलीच पाहिजे, ही काळाची गरज संयोजनकांना ओळखता आले नसल्याचे म्हणत त्यांनी आयोजकांना धारेवर धरले.

साहित्य हा एक उत्सव असतो पण अनेक कारणांनी आपण त्या आनंदोत्सवाचं स्वरुप गढूळ होऊ दिले. आपले दुर्लक्ष, भाबडेपणा आणि मर्यादित समज, आपल्या लहानसहान मोहांना आणि वाडमयीन राजकारणाला सहज बळी पडणे, या सगळ्या आणि इतर कारणांमुळे आपण हा उत्सव भ्रष्ट होऊ दिला, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

नयनतारा सहगल यांचे निंमत्रण रद्द केल्याने केवळ संयोजन समिती नव्हे, केवळ साहित्य संमेलन नव्हे तर सगळ्या मराठी साहित्यप्रेमींच्याच माना खाली जाताहेत याची गंभीर जाणीव असायला हवी होती. शिवाय या धमक्या बळाच्या जोरावर का होईना पण कोणत्याही विधायक गोष्टींचा आग्रह धरणा-या नव्हेत, असे त्या म्हणाल्या. यवतमाळ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, दूर डेहराडूनवरून प्रवास करीत वयाच्या 93 व्या वर्षी नयनतारा येथे येणार होत्या. त्यांचे नियोजित भाषण आता आपल्यासमोर आले आहे. त्यांचे राजकीय विचार काही थोडेफार अपवाद वगळता वाचकांसमोर आले आहेत. संमेलनाला त्यांना निमंत्रित करताना जो हेतू मराठी माणसांच्या मनात होता त्याला त्या राजकीय विचारांचा रंग आता चढला आहे. त्यांच्या तशा विचारांशी सहमत असणारे आणि नसणारे असे दोन्ही प्रकारचे वर्ग मराठी वाचकांमध्ये अद्याप तयार व्हायचे असतानाच त्यावरून एक लढाई सुरू झाली आहे.

ढेरे म्हणाल्या, नयनतारा यांनी यावं आणि अगदी मोकळेपणाने, निर्भयपणे आपले विचार या व्यासपीठावरून मांडावेत. त्यांचे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राखले जावे. त्यांची मते आपण जाणून घ्यावीत, ती आपल्याजवळच्या विवेकाने पारखावीत. स्वत:च्या मतांच्या मांडणीचे संपूर्ण स्वातंत्र्य त्यांना असलंच पाहिजे. त्या मतांशी संपूर्ण सहमत होण्याचे, असहमत होण्याचे किंवा वेगवेगळ्या बाजूंनी त्यांच्या मतांचा विचार करत त्यांची मौलिकता तपासायला हवी होती.

कोणीही यावं आणि वाडमयबाह्य कारणांसाठी किंवा वाडमयीन राजकारणासाठी हे संमेलन वेठीला धरावे असे आता आपण होऊ देता कामा नये. दर वर्षी कोणत्या ना कोणत्या अत्यंत गौण, क्षुद्र, कित्येकदा लाजिरवाण्या कारणांनी संमेलनं ही वादाचा विषय झाली. भल्या वाचकांनी, निर्मळ साहित्यप्रेमींनी आणि वृत्तीगांभिर्याने लेखन करणाऱ्यांनी संमेलनाच्या या स्वरुपाबद्दल चिंता व्यक्त केली.

साहित्यातील शक्तींना आपण ओळखले नसल्याचे सांगताना त्या म्हणाल्या आपल्या हातून तिची अवहेलना झाली, तर आता त्या गोष्टीची भरपाई करण्याची वेळ आली आहे. आपल्याला साहित्यावरचं राजकारण नको आणि साहित्यजगातलं राजकारणही नको आहे. या दोन्ही गोष्ठी झुगारून देण्याची वेळ आली आहे. काय चांगले आणि काय वाईट, काय हितकारकर आणि काय हानिकारक याचा विवेक करण्याची वेळ आपल्या व्यक्तीजीवनात आणि समूहजीवनातही अनेकदा येते. इतिहासात अशा अनेक वेळा आल्या आहे की अगदी आणीबाणीच्या प्रसंगी समाजाने आपला विवेक जागा ठेवला आहे. आपला विवेक जागा ठेवण्याची ही वेळ आहे. हा उत्सव पुन्हा निर्मळ करण्याची संधी आहे. सुरूवात आहे पण बदल एका रात्रीत होत नसतात. सगळे अपेक्षित सकारात्मक बदल तर दीर्घकाळ होत राहतात. ते चिकाटीने करायला लागतील, असेही ढेरे म्हणाल्या.

ढेरे म्हणाल्या, कोणीही यावं आणि वाडमयबाह्य कारणांसाठी किंवा वाडमयीन राजकारणासाठी हे संमेलन वेठीला धरावे असे आता आपण होऊ देता कामा नये. दर वर्षी कोणत्या ना कोणत्या अत्यंत गौण, क्षुद्र, कित्येकदा लाजिरवाण्या कारणांनी संमेलनं ही वादाचा विषय झाली. भल्या वाचकांनी, निर्मळ साहित्यप्रेमींनी आणि वृत्तीगांभिर्याने लेखन करणाऱ्यांनी संमेलनाच्या या स्वरुपाबद्दल चिंता व्यक्त केली.