व्यंगचित्रांचे फटकारे मारणाऱ्यांच्या समर्थकांनी ही मारहाण करावी?

Raj Thackeray-Uddhav Thackeray-Cartoonist

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) म्हणजे जाज्वल्य देशाभिमान, जाज्वल्य हिंदुत्ववाद. त्यांच्या वाणीतून आग बाहेर पडायची, त्या आगीच्या लोळांनी राष्ट्रविरोधी ताकदींना जबरदस्त झळा बसायच्या. बाळासाहेब तितकेच संवेदनशीलदेखील होते. त्यांच्या संवेदनशील कुंचल्याने अनेक बड्या नेत्यांना फटकारे दिले. मार्मिक या शिवसेनेच्या साप्ताहिकात त्यांची शेकडो व्यंगचित्रे छापली गेली. इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, जॉर्ज फर्नांडिस, शरद पवार,यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील,  बॅरिस्टर अंतुले अशा एक ना अनेक नेत्यांना त्यांच्या कुंचल्याने घायाळ केले. त्याच बाळासाहेबांना मानणाºया शिवसैनिकांनी  एक व्यंगचित्र वॉट्सअ‍ॅपवर फॉर्वर्ड केले म्हणून ६५ वर्षीय वृद्धाला मारहाण करावी हे दुर्देवी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे राज ठाकरे  (Raj Thackeray)यांच्याप्रमाणे व्यंगचित्रकार भलेही नाहीत पण ते उत्तम कलावंत आहेत, चांगले छायाचित्रकार आहेत. कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कदर करणारे आहेत. निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा (Madan Sharma) यांच्यावर कांदीवली; मुंबईच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये काही शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याचे मुख्यमंत्री कधीही समर्थन करतील असे वाटत नाही. मात्र, त्यांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. ‘प्रख्यात व्यंगचित्रकाराने जन्म दिलेल्या पक्षाने व्यंगचित्र फॉर्वर्ड केले म्हणून मारहाण करावी’ असा सवाल शनिवारी दिवसभर सोशल मीडियातून केला जात होता.

शर्मा यांच्यावरील हल्ल्यात आता केंद्र सरकारने आणि तेही थेट संरक्षण मंत्री राजनाथसिंह (Rajnath Singh) यांनी उडी घेतली आहे. त्यांनी शर्मा यांना दूरध्वनी करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. एवढेच नव्हे तर निवृत्त संरक्षण अधिकाºयावरील असला हल्ला खपवून घेतला जाणार नाही असा सज्जड दम देणारे ट्विटही राजनाथसिंह यांनी केले आहे. शर्मा हे स्वत: शनिवारी माध्यमांना सामोरे गेले. कायदा व सुव्यवस्था सांभाळू शकत नसतील तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. ‘माझ्यावरील हल्ल्याबद्दल उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांनी देशाची माफी मागावी. माझ्यावर हल्ला करण्यात आला आणि नंतर मलाच पकडण्यासाठी माझ्या घरी पोलीस पाठविण्यात आले. आमदार अतुल भातखळकर यांनी मला वाचविले नाहीतर पोलिसांनी मलाच तुरुंगात डांबून ठार केले असते असे शर्मा म्हणाले. माझ्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी घ्यावी. उद्या माझ्या कुटुंबाचे काही बरेवाईट झाले तर त्याची जबाबदारी ठाकरे यांची असेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. दुसरीकडे शर्मांवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी मुंबईत निदर्शने केली.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे शनिवारी पाटण्यात होते. शर्मा यांच्यावरील हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी महाराष्ट्रात सरकारपुरस्कृत दहशत माजवली जात असल्याचा गंभीर आरोप केला. दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र आणि बिहारच्या राजकारणातील उभरते सितारे चिराग पासवान यांनी शर्मा यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी प्रतिक्रिया देताना महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. एकूणच शर्मांना मारहाण करण्याचे हे प्रकरण एवढ्यात मिटणार नाही असे दिसते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER