चुलत बहीण-भावाच्या लग्नाप्रमाणेच ‘लिव्ह-इन’ही बेकायदा मानावे का? : पंजाब हायकोर्टापुढे उपस्थित झालेला प्रश्न

Punjab & Haryana HC

चंदीगढ : हिंदू समाजातील सख्ख्या चुलत बहीण आणि भावाने लग्न न करता पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहणे हे केवळ अनैतिक आहे की असे संबंध बेकायदाही ठरतात, असा एक विचित्र प्रश्न पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयापुढे एका प्रकरणाच्या सुनावणीत उपस्थित झाला आहे.

हिंदू विवाह कायद्यानुसार चुलत भावा-बहिणीचा विवाह हा ‘सपिंडी विवाह’ असल्याने तो मुळातच बेकायदा ठरतो. परंतु कायद्याची ही निषिद्धता अशा दोन व्यक्तींच्या ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’लाही लागू होते का? असा हा प्रश्न आहे. २१ वर्षांचा अमर व १७ वर्षांची कल्पनाही चुलत भावंडे असून ती एकमेकांच्या प्रेमात आहेत. दोघांचे वडील सख्खे भाऊ आहेत. घरच्यांचा विरोध असल्याने अमर व कल्पना घरातून पळून गेले. कल्पनाच्या आईने अमरविरुद्ध अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद नोंदविली. त्याआधी अमर व कल्पना यांनी जीवाला धोका असल्याने पोलीस संरक्षणासाठी याचिका केली होती. त्या याचिकेत कल्पनाने शपथपूर्वक असे निवेदन केले होते की, आमचे एकमेकांवर प्रेम आहे. अद्याप मी सज्ञान नसल्याने अमरसोबत ‘लिव्ह-इन’ने राहात आहे. वयाला १८ वर्षे पूर्ण झाल्यावर मी त्याच्याशी लग्न करणार आहे.

न्यायालयाने त्या याचिकेवर स्वत: निर्णय न देता संरक्षण द्यायचे की नाही, हे ठरविण्याचा निर्णय पोलिसांवर सोपविला होता. आता अमरने केलेली नवी याचिका त्याच्याविरुद्ध नोंदविलेला गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी आहे. मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही याचिका करताना अमरने कल्पना ही आपली सख्खी चुलत बहीण आहे, ही बाब उघड केली नव्हती. काही दिवसांपूर्वी ही याचिका न्या. अरविंद सिंग संगवान यांच्यापुढे सुनावणीस आली तेव्हा पब्लिक प्रासिक्युटरने ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणली. त्यांचे म्हणणे असे होते की, हिंदू विवाह कायद्यानुसार चुलल भावा-बहिणीचा ‘सपिंडी विवाह’ पूर्णपणे निषिद्ध असून अशा विवाहास कायदा अवैध मानतो. त्यामुळे सज्ञान झाल्यावर कल्पनाने अमरशी विवाह केला तरी तो अवैध असेल. त्यामुळे या दोघांना परस्परांशी विवाह करण्याची कायद्याने परस्परांशी विवाह करण्याची परवानगीच नसल्याने त्यांनी तोपर्यंत ‘लिव्ह-इन रिलेशन’मध्ये राहण्याचा प्रश्न उद्भवत नाही. चुलत भावा-बहिणाने असे एकत्र राहणे अनैतिक असल्याने समाजास अमान्य आहे.

यावर न्यायाधीश संगवान यांनीही या दोघांचे भविष्यात होणारा संभाव्य विवाहही मुळातच अवैध असेल, असे मत नोंदविले. पण तरीही विवाहापर्यंत दोघांनी ‘लिव्ह-इन’मध्ये एकत्र राहणे का बेकायदा ठरत नाही, हे आपण दाखवून देऊ असे सांगून अमरच्या वकिलाने वेळ मागून घेतला. त्यानुसार न्यायालयाने ११ जानेवारी रोजी सुनावणी ठेवली.

अजित गोगटे

(टीप: या प्रकरणातील पक्षकारांची अमर व कल्पना ही खरी नावे नाहीत. व्यक्तिगत जीवनात त्रास होऊ नये यासाठी वृत्तात खरी नावे न देता काल्पनिक नावे दिली आहेत.)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER