ऑनलाइनवर खरेदीचा धुमाकूळ

- अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टची साऱ्यांनीच केली कमाई, ग्राहकांच्या ऑफर्सवर उड्या

मुंबई :- नवरात्राच्या निमित्ताने अॅमेझॉन व फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांनी ऑनलाइन सेल आणला होता. या सेलमधील असंख्य ऑफर्सवर ग्राहकांनी अक्षरश: उड्या मारल्या. खरेदीचा धुमाकूळ पाहायला मिळाला.

सणासुदीनिमित्त आयोजित केलेल्या पहिल्या टप्प्यातील सेलमुळे ऑनलाइन कंपन्या मालामाल झाल्या आहेत. २९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या संकेतस्थळांवर विशेष सेल होता. या अवघ्या सहा दिवसांच्या सेलमध्ये दोन्ही कंपन्यांनी तब्बल १९ हजार कोटी रुपयांच्या सामानाची विक्री केली आहे.

ही बातमी पण वाचा : केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट

बेंगळुरूची रिसर्च कंपनी रेडसीर कंसल्टंसीनुसार, सेल दरम्यानच्या सहा दिवसांच्या विक्रीमध्ये फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनचा बाजारतील हिस्सा तब्बल ९० टक्के होता. यात सर्वाधिक वाटा मोबाइल विक्रीचा होता. विक्री झालेल्या सामानांमध्ये ५५ टक्के विक्री मोबाइलच्या श्रेणीतून झाली. सणासुदीच्या काळातील पहिल्या टप्प्यातील सेलमध्ये मिळालेल्या प्रतिसादामुळे ऑक्टोबर महिन्यात फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनच्या ऑनलाइन विक्रीचा आकडा 39 हजार कोटी रुपये होऊ शकतो अशी शक्यता आता वर्तवली जात आहे.

आव्हानात्मक आर्थिक परिस्थितीतही सणासुदीच्या सेलमधील पहिल्या टप्प्यात विक्रमी ३०० कोटी डॉलरच्या सामानाची विक्री झाली. यातून ऑनलाइन खरेदीकडे ग्राहकांचा वाढता कल लक्षात येतोय तसेच ऑनलाइन खरेदीला ग्राहकांची पसंती असल्याचे हे संकेत आहेत, असे या सर्वेक्षणात नमूद आहे.