टायगर 3 चे पुढील महिन्यात मुंबईतच सुरु होणार शूटिंग

सलमान खानच्या (Salman Khan) हातात अनेक प्रोजेक्ट असल्याने तो एक-एक प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे लक्ष देत आहे. यासाठी तो दोन-दोन कधी कधी तर तीन शिफ्टमध्येही काम करीत आहे. ‘राधे’चे (Radhe) सर्व काम पूर्ण केल्यानंतर त्याने ‘अंतिम’चे शूटिंगही जवळ-जवळ पूर्ण केले आहे. हे दोन्ही सिनेमे लवकर प्रदर्शित करण्याचा त्याचा विचार असल्याने त्याच्या पोस्ट प्रॉडक्शन आणि प्रचारावरही तो लक्ष देणार आहे. मात्र यासाठी त्याला मुंबईतच राहाणे आवश्यक असल्याने त्याने त्याच्या पुढील सिनेमांचे शूटिंग मुंबईतच करावे असे निर्मात्यांना सांगितले आहे. त्यामुळेच यशराजने त्यांच्या ‘टायगर 3’ (Tiger 3) चे शूटिंग मुंबईत सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यात मुंबईत या सिनेमाचे शूटिंग सुरु केले जाणार असल्याचे समजते.

‘धूम’नंतर ‘टायगर’ ही यशराज फिल्म्सची अत्यंत यशस्वी फ्रेंचायजी आहे. भारतीय गुप्तहेराची कथा सांगणारा ‘टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते. त्यामुळेच यशराजने पुन्हा एकदा सलमान खान आणि कॅटरीनाला घेऊन ‘टायगर 3’ ची योजना आखली आहे. हा सिनेमा अगोदरच्या दोन्ही सिनेमांपेक्षा भव्य आणि अॅक्शनने भरलेला असणार आहे. या सिनेमाचे शूटिंग परदेशातच केले जाणार होते. फक्त पॅचवर्क आणि काही शूटिंग मुंबईत करण्याची योजना यशराजने आखली होती. पण कोरोनामुळे परदेशात प्रवास करणे अजून सुलभ झालेले नसल्याने आणि सलमान खानचा राधे ईदला प्रदर्शित केला जाणार असल्याने त्याच्या प्रचारासाठी सलमानला मुंबईत राहाणे आवश्यक असल्याने टायगरच्या शूटिंग शेड्यूलमध्ये बदल करण्यात आला आहे.

नव्या बदलानुसार आता मार्चमध्ये यशराज स्टुडियोमध्ये ‘टायगर 3’ चे शूटिंग सुरु केले जाणार असून ते जवळ-जवळ एक महिना चालणार आहे. या शूटिंगमध्ये सलमान खान आणि कॅटरीनासह सिनेमातील अन्य कलाकार भाग घेणार आहेत. एप्रिल महिन्यात हे दोघेही त्यांच्या दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये बिझी राहाणार आहेत. त्यानंतर जूनमध्ये ‘टायगर 3’ चे परदेशात शूटिंग सुरु केले जाणार आहे. परदेशात 45 ते 50 दिवसांचे शूटिंग केले जाणार आहे. दिग्दर्शक मनीष शर्माच्या या सिनेमात सलमान खानची दोन रुपे दिसणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER