‘ब्रह्मास्त्र’चे शूटिंग झाले सुरु

ब्रह्मास्त्र

रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि पाहुणा कलाकार असलेल्या शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) ब्रह्मास्त्र चित्रपटाचे आता लवकरच शूटिंग सुरु होणार असल्याचे समजते. अनलॉक सुरु झाल्यापासून सर्वप्रथम अक्षयकुमारने (Akshay Kumar) त्याच्या बेलबॉटमचे शूटिंग सुरु केले होते. पण त्यासाठी तो परदेशात गेला होता. त्यानंतर भारतात अनेक चित्रपटांचे शूटिंग सुरु झाल्याने निर्मात्यांमध्ये आनंद पसरला आहे. अनलॉक असल्याने आता धर्मा प्रोडक्शन आणि फॉक्स स्टार स्टुडियो द्वारा निर्मित अत्यंत खर्चिक आणि भव्य असा चित्रपट ब्रह्मास्त्रचे शूटिंग सुरु करण्यात येणार आहे. खरे तर हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार होता परंतु लॉकडाऊनमुळे याचे शूटिंग होऊ शकले नव्हते.

लॉकडाउनच्या (Lockdown) काळात दिग्दर्शक अयान मुखर्जीने चित्रपटाच्या व्हिज्युअल इफेक्ट्स आणि अगोदर शूट झालेल्या भागांचे डबिंग आणि काही दृश्यांचे पोस्ट प्रोडक्शन काम केले. चित्रपटाचे आता काही दिवसांचेच शूटिंग बाकी असून लवकरच मुंबईतील एका स्टुडियोमध्ये दहा दिवसांच्या शूटिंग शेड्यूलची योजना तयार करण्यात आली आहे. या शूटिंग शेड्यूलमध्ये रणबीर, आलिया भट्ट, नागार्जुन आणि मौनी राय भाग घेणार आहेत. हे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर दोन गाण्यांचे शूटिंग सुरु केले जाणार आहे. या दोन्ही गाण्यांसाठी मोठ्या प्रमाणावर बॅकग्राउंड डान्सरची आवश्यकता असल्याने जानेवारी 2021 मध्ये ही गाणी शूट केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

लॉकडाऊनमुळे शूटिंगला उशीर झाला असल्याने चित्रपटाचे बजेटही वाढले आहे. मात्र जे बजेट नक्की झाले होते त्याच बजेटमध्ये आता अयानला चित्रपट पूर्ण करावा लागणार आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे फॉक्स स्टारने भारतातील आपला व्यवसाय कमी करण्याचा निर्णय घेतला असून ब्रह्मास्त्र हा त्यांचा शेवटचा चित्रपट असेल असे सांगितले जात आहे. चित्रपट पूर्ण झाल्यानंतरच याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाईल असेही सूत्रांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER