धक्कादायक : का केली असावी शीतल आमटे यांनी आत्महत्या?

Sheetal Amte

प्रख्यात समाजसेवक डॉ.बाबा आमटे यांच्या नात डॉ.शीतल आमटे करजगी यांनी आज सकाळी वरोरा येथे आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यांनी ‘वॉर अँड पीस’ असे लिहित हे चित्रही फेसबूकवर टाकले. त्यातून त्यांना काय सांगायचे होते. घरच्यांशी आधी वाद झाला आता मी शांततेचा स्वीकार करीत आहे असे तर त्यांना म्हणायचे नव्हते ना? डॉ. शीतल या डॉ.विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे यांच्या कन्या.

आनंदवनचे संचालन हे महारोगी सेवा समितीच्या वतीने केले जाते. डॉ.शीतल या सदर समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. सोशल मीडियामध्ये व मुख्यत्वे फेसबूकवर त्या अतिशय अ‍ॅक्टिव्ह होत्या. स्वत:ला विषारी इंजेक्शन टोचून मृत्यूला कवटाळण्यापूर्वी त्यांनी ‘वॉर अँड पीस’ ही पोस्ट टाकली व अ‍ॅक्रॉलिक पेंटिंगही पोस्ट केले. कुंचल्याच्या एकात एक घुसलेल्या रंगीबेरंगी रेषा त्यात दिसतात. याचा अर्थ त्यांच्या आयुष्यात कमालीची गुंतागुंत तयार झाली होती आणि त्यातून सुटण्याचा मार्ग त्यांना दिसत नव्हता आणि म्हणून त्यांनी मृत्यूचा पर्याय निवडला का हा प्रश्न निर्माण होतो.

आयुष्य इतके गुंतागुंतीचे झालेले आहे त्यामुळे मी आता आत्महत्येचा मार्ग पत्करत आहे असे तर त्यांना सुचवायचे नव्हते? त्या चित्रातून नेमकी कोणतीही एक आकृती स्पष्ट होत नाही. आपल्या आयुष्यात आता कोणतेही ध्येय राहिले नसून सगळी जागा गुंतागुंतीने व्यापली आहे असे तर त्यांना सुचवायचे नव्हते? शीतल प्रचंड तणावाखाली होत्या आणि त्यांचे मन गोंधळलेले होते. त्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे.

शीतल यांच्या आत्महत्येला कौटुंबिक वादाची किनार आहे का याची चर्चा अर्थातच सोशल मीडियावर लगेच सुरू झाली. त्याचे कारणही तसेच आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यातील एका आघाडीच्या दैनिकाने महारोगी सेवा समितीच्या कार्यात शीतल यांचा मनमानीपणा सुरू असून त्यांनी सेवा समितीच्या मूळ उद्देशांनाच कसा हरताळ फासला आहे याचे वर्णन छापून आले होते. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या शीतल यांनी फेसबूकवरून एकेक आरोप खोडून काढले होते. आमच्या संस्थेत या आणि बघा आम्ही काय काय चांगले केले आहे ते असे आव्हानही त्यांनी दिले होते.शीतल आणि त्यांचे बंधू कौस्तुभ आमटे यांच्यात मतभेद झाले होते. त्यातून कौस्तुभ हे सेवा समितीतून बाहेर पडले होते. सर्व सूत्रे शीतल यांनी आपल्या हाती घेतली होती असे म्हटले जाते. कौटुंबिक वादावर तोडगा काढला जाईल, असे विकास आमटे यांनी म्हटले होते.

२२ नोव्हेंबरला म्हणजे आठ दिवसांपूर्वीच डॉ.विकास आमटे, डॉ.भारती आमटे, डॉ.प्रकाश आमटे, डॉ.मंदाकिनी आमटे यांनी एक पत्रक काढले. त्यात,‘डॉ.शीतल करजगी या मानसिक ताण, नैराश्याचा सामना करीत आहेत. त्यांनी अलिकडेच समाजमाध्यमांवर तशी कबुली स्पष्टपणे दिलेली आहे. महारोगी सेवा समितीबद्दल, विश्वस्तांबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल अनुचित वक्तव्ये त्यांनी केली. त्यांचे सर्व भाष्य तथ्यहिन आहे. त्यांच्या निवेदनामुळे कोणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून आमटे परिवार हे संयुक्त निवेदन परस्पर विचारविनिमय करून प्रस्तुत करीत आहे’, असे म्हटले होते. ‘कोणत्याही अपप्रचारावर विश्वास ठेवू नये. सात दशकांच्या परंपरेला अनुसरून यापुढेही आम्ही काम करीत राहू’ अशी ग्वाही त्यात देण्यात आली होती. या निवेदनानंतर शीतल आमटे अधिकच एकाकी झाल्या असाव्यात, असे मानले जाते.

बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी आनंदवनची निर्मिती केली. समाजाने नाकारलेल्या कुष्ठरोग्यांना त्यांनी हक्काचे घर दिले, निवारा दिला आणि जगण्याची नवी उमेदही दिली. साºया जगाने त्यांचे कौतुक केले. जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा मॅगेसेसे पुरस्कार त्यांना मिळाला होता. शरीर साथ देत नसताना, पाठीचे जीवघेणे दुखणे असतानाही बाबांनी कुष्ठरोगी सेवेचा यज्ञ अखंडपणे सुरू ठेवला. त्यांचे पुत्र विकास हे या कामात त्यांना मदत करीत. दुसरे पुत्र डॉ. प्रकाश आमटे यांनी गडचिरोलीच्या निबिड अरण्यात आदिवासींच्या सेवेसाठी हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्पाची उभारणी केली. ते आणि त्यांच्या पत्नी आजही अत्यंत प्रभावीपणे तेथे कार्यरत आहेत.

शीतल आमटे यांनी 20 नोव्हेंबर 2020 रोजी फेसबुक लाईव्ह करत संवाद साधला. यावेळी त्यांनी आपला सख्खा भाऊ कौस्तुभ आमटे, काका आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबावर बेछुट आरोप केले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली. यानंतर काही वेळातच त्यांनी आपलं हे फेसबुक लाईव्ह डिलीटही केलं. यानंतर त्यांनी लवकरच आपण आपली अधिकृत भूमिका जाहीर करु असं सांगितलं. तसेच फेसबुक लाईव्ह डिलीट करण्यास भाग पाडल्याचंही म्हटलं होतं.

भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील तरुणांना सामाजिक क्षेत्रात कामाला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. शीतल आमटे यांनी मशाल आणि चिराग या कार्यक्रमांची उभारणी केली होती. त्याच्या त्या संस्थापक होत्या. त्यांनी नुकतंच निजबल नावाचं एक सेंटरही सुरु केलं होतं. याअंतर्गत शारीरिक अपंगत्व आलेल्या नागरिकांना स्वावलंबी करण्यासाठी आणि त्यांना विविध कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध करुन देण्यासाठी काम केलं जात होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER