धक्कादायक : राष्ट्रवादी महिला नेत्यांच्या खुनाची सुपारी दिली ‘सकाळ’च्या संपादकाने

Rekha Jare

अहमदनगरमध्ये अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे (Rekha Jare) यांची ३० नोव्हेंबर रोजी अहमदनगर-पुणे मार्गाव,र जातेगाव फाट्यानजीक हत्या करण्यात आली होती. या हत्येची सुपारी सकाळ या आघाडीच्या दैनिकाचे अहमदनगर आवृत्तीचे कार्यकारी संपादक बाळ बोठे (bal-bothe) यांनी दिली होती हे आता उघडकीस आले आहे. अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनीच ही माहिती पत्रकारांना दिली.बोठे यांच्यासोबत सुपारी देणारे दुसरे व्यक्ती होते, सागर भिंगारदिवे.

या खून प्रकरणात बोठे यांचे नाव आल्याने संपूर्ण पत्रकारिता जगतात खळबळ माजली आहे. कारण बोठे हे बडे पत्रकार आहेत. अहमदनगरचे राजकारण, समाजकारण, साहित्य वर्तुळात त्यांचा मोठा दबदबा आहे. त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. अनेक पुरस्कार त्यांनी मॅनेज केले असेही म्हटले जाते.

बोठे यांच्याकडील मोठी संपत्ती हादेखील चर्चेचा विषय ठरला आहे. पत्रकारितेत त्यांनी अनेकांना पुढे आणले आणि सोईचे नसलेल्या अनेकांना संपविले असेही त्यांच्या बाबतीत म्हटले जाते. अहमदनगरमधील त्यांचा अवाढव्य बंगला डोळे दिपविणारा आहे. तिथे स्विमिंग टँकपासून सगळ्या सोईसुविधा आहेत. काही वर्षांपूर्वी एका स्थानिक पत्रकारासोबत छोट्या रुममध्ये पार्टनर म्हणून राहणारे बोठे हे आता मोठे प्रस्थ बनले आहेत.

बोठे हे सध्या फरार आहेत. पोलीस त्यांचा तपास घेत आहेत. रेखा जरे हत्येप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. जरे यांची हत्या झाली तेव्हा त्यांच्या कारमध्ये त्यांचा मुलगा होता आणि त्याने मोबाईलमध्ये आरोपींचा फोटो काढला. त्यावरून पोलिसांनी आरोपींना अटक केली पण या हत्येची सुपारी बोठे यांनी दिली होती ही अत्यंत धक्कादायक बाब आज समोर आली.

आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे रेखा जरे यांच्या अंत्यसंस्कारावेळी बाळ बोठे हे स्वत: हजर होते आणि अतिशय गंभीर चेहरा करून त्यांनी जरे कुटुंबाचे सांत्वनदेखील केले होते. आता प्रश्न असा आहे की बोठे यांनी जरेंच्या हत्येची सुपारी का दिली? बोठे असे कोणते व्यवहार जरे यांना माहिती होते की जे बाहेर आले तर आपली अडचण होईल असे बोठेंना वाटत होते? बोठे आणि जरे यांचे संबंध नेमके कोणत्या पातळीवरील होते याचा तपास आता पोलीस करीत आहेत. जरे या राष्ट्रवादीच्या जिल्हास्तरीय नेत्या होत्या. महिला बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी चांगले कामही केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER