सत्तेतून बाहेर पडणार हि शिवसेनेची विनोदाची भाषा – सुप्रिया सुळे

Supriya

पंढरपूर: राज्यातील सत्तेत सहभागी असलेली शिवसेना ही सतत सत्तेतून बाहेर पडण्याची भाषा वापरत असते. सेनेची ही भाषा म्हणजे हा एक विनोदच आहे अशी खोचक टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खा.सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मात्र, नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता सुळे यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे या पंढरपूर येथील केबीपी महाविद्यालयातील एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. या कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी सुळे म्हणाल्या की, राज्यातील शिवसेना सत्तेत सहभागी असूनही काही ना काही कारणावरून सरकारवर कुरघोडी करत असते. आमचे मंत्री खिशात राजीनामे घेवून फिरत आहेत. आणि आता तर काय म्हणे सत्तेतून बाहेर पडू.अशी भाषा वापरणे म्हणणे म्हणजे एक विनोदच आहे, अशी खोचक टीका खा. सुळे यांनी केली. तसेच राणे यांच्या भाजपा प्रवेशामुळे शिवसेनासत्तेतून बाहेर पडेल, असे स्पष्टपणे सांगता येत नाही. असे म्हणत खा. सुळे यांनी या मुद्द्यावर बोलण्यास नकार दिला.

खा. सुळे यांनी या वेळी राज्य सरकारवर टीका केली. सध्या पेट्रोल,डीझेलच्या दरवाढी बाबत विचारले असता खा. सुळे यांनी भाजपवर तोफ डागली. पूर्वी इंधन दरवाढ झाली की एक मावशी येत होती. आता मी ती मावशी शोधत आहे, असे त्या म्हणल्या. सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराबाबत सध्या दोन समाजामध्ये विचारांचा संघर्ष सुरु आहे. वेगवेगळ्या नावासाठी मोर्चे काढण्यात येत आहेत. यामधून सरकारची निष्क्रियता दिसून येत असून सरकार या प्रकरणी पूर्णपणे अपयशी ठरले आहे असे त्या या वेळी म्हणाल्या.

वर्ष उलटले तरी कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा झालेली नाही. आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी खा. सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली. कोपर्डी प्रकरणात तुम्ही काय केले, या मुलींनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘वास्तविक पाहता हा खटला तातडीने चालवून आरोपींना फाशीची शिक्षा होईल असे वाटले होते. काळिमा फासणारी घटना घडून वर्ष उलटून गेले तरी पीडित कुटुंबाला न्याय मिळत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. असेही खास. सुप्रिया सुळे म्हणाल्या.