विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड; नऊ शिवसैनिकांना अटक

- इफ्को टोकिओला पिकविम्याचे पैसे देणे नाही !

shivsena-workers-arrested-for-vandalising-insurance-office-in-pune.jpg

पुणे : पुण्यातील इफ्को टोकिओ विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी नऊ शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील इफ्को टोकिओ विमा कंपनीला सुमारे एक लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचे २३.९२ कोटी रुपये देणे आहेत, असा आरोप शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी केला असला तरी ज्या विमा कंपन्यांना शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे देणे आहेत त्यात इफ्को टोकिओचा समावेश नाही.

शिवसेनेने इफ्को टोकिओत केलेली तोडफोड ही शुद्ध राजकीय गुंडगिरी आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे लगेच मिळावेत या मागणीसाठी ६ नोव्हेंबर रोजी शिवसैनिकांनी हिंसक आंदोलन केले. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील मंगलदास रोजवर इफ्को टोकिओ कंपनीचं कार्यालय आहे. या कार्यालयात कामकाज सुरू होत असताना शिवसैनिक येथे घुसले आणि कार्यालयाची तोडफोड केली. शेतकऱ्यांची अडवणूक कराल तर शिवसेना आपल्या ‘स्टाईल’ने उत्तर देईल, असा इशारा देण्यासाठी शिवसेनेने पीक विमा कंपन्यांच्या विरोधात मोर्चा काढला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असंदेखील त्यांनी म्हटलं आहे. शिवाय बँकांनी शेतकऱ्यांना नोटिसा पाठवू नये, असंदेखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.