..अन्यथा शिवसेनेचे उपकार विसरलेल्या राणेंना शिवसैनिकच धडा शिकवतील

Nilesh Rane

सोलापूर : राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार सत्तेत आले. तेव्हापासून भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) हे सतत शिवसेना आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या निलेश राणे यांच्याविरोधात सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

निलेश राणे यांच्या घराण्याला शिवसेनेनेच राजकीय ओळख दिली आहे; मात्र शिवसेनेचे उपकार विसरून ते भाजपच्या नेत्यांना खूश करण्यासाठी एखाद्या पिसाळलेल्या श्वानाप्रमाणे शिवसेनेवर  भुंकत असल्याचा घणाघात शिवसेना नेते नागेश वनकळसे यांनी केला. निलेश राणे यांनी खालच्या पातळीच्या भाषेचा वापर करत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राणेविरोधात संताप व्यक्त केला आहे. राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा मोहोळचे शिवसेना नेते नागेश वनकळसे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

ते म्हणाले की, आपली राजकीय कारकीर्द संपुष्टात येण्याची जाणीव निलेश राणे यांना झाली असावी. दरवेळी आपल्याला शिवसैनिक आडवा करत असल्यामुळे त्यांच्या मनात दुःख आहे. त्यामुळेच वैफल्यग्रस्त होऊन राणे शिवसेनेवर तोंडसुख घेत आहेत. राणे म्हणजे कोणताच विकासात्मक अजेंडा नसलेल्या शून्य विचारधारेचा अविवेकी व्यक्ती आहे. यापुढे त्यांनी टीका करण्याचा स्तर सुधारावा, नाही तर शिवसैनिक ठेवणीतल्या अशा  शिव्या हाणतील की, त्यांच्या कानाचे पडदे फाटतील. राणे यांनी नशा उतरल्यावर याचे भान ठेवावे; अन्यथा शिवसैनिक गप्प बसणार नसल्याचा इशारा नागेश वनकळसे यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER