नाणारवरून युती तुटण्याची शक्यता?

Shiv sena-CM Fadnavis

मुंबई : शिवसेनेने आरेला विरोध केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही नाणार येणार असल्याचा नारा दिला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांत तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या नाणार येणारच्या पुनरुच्चारामुळे शिवसेना नाराज झाली आहे. नाणार रद्द झाल्याची घोषणा झाल्यानंतर परत मुख्यमंत्र्यांनी नाणारचा विषय काढून जनतेच्या मनात असंतोष निर्माण केल्याची भावना शिवसेनेकडून व्यक्त होत आहे.

या विषयावर स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच बोलतील, बाकी कोणीही बोलणार नाही, असं ठरल्याचं कळत आहे. तसंच आज (१८ सप्टेंबर) रोजी संध्याकाळी राजापूर परिसरात शिवसेना समर्थक मुख्यमंत्र्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याच्या तयारीत असल्याचंही समजतं. त्यामुळे ज्या नाणार प्रकल्पावरून लोकसभा निवडणुकीला युती झाली होती त्याच नाणारवरून युती तुटतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा अंतिट टप्पा सुरू आहे. ही यात्रा सध्या कोकण विभागात आहे.

मुख्यमंत्र्यांचा रथ रत्नागिरी जिल्ह्यात पोहचल्यानंतर तेथे त्यांनी नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प सुरू करण्याचे संकेत दिले. कोकणात हा प्रकल्प झाल्यास कोकणाचा कायापालट होईल, युवकांना रोजगार मिळेल. ज्या प्रकारे या प्रकल्पाला लोकांनी विरोध केला तो पाहून त्यावेळी हा प्रकल्प न उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, आता आपला उत्साह पाहता हा प्रकल्प उभारण्यावर पुन्हा एकदा चर्चा करावी लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.