शिवसेनेला मोठा धक्का; उल्हासनगरमधील वरिष्ठ नगरसेवकाचा मृत्यू

Sunil Surve

उल्हासनगर : उल्हासनगर : मुंबईसह उपनगरातही कोरोनाचा (Corona) हाहाकार सुरूच आहे. रुग्णसंख्येसोबत मृत्युसंख्येचा आकडाही वाढतच चालला असून, आज उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेच्या (Shivsena) तिकिटावर नगरसेवकपदी निवडून आलेले वरिष्ठ नगरसेवक सुनील सुर्वे (Sunil Surve) यांचं निधन झालं. उल्हासनगरच्या (Ulhasnagar) खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. विशेष म्हणजे सुनील सुर्वे यांनी २५ दिवसांपूर्वी कोरोनावर मात केली होती.

त्यांना मागील महिन्यात कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं होतं. त्यावेळी ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं. जवळपास २३ दिवस उपचार घेतल्यानंतर कोरोनावर मात करून ते घरी परतले होते. मात्र त्यांना १५ दिवसांपूर्वी पुन्हा श्वसनाचा त्रास होऊ लागला, म्हणून त्यांच्यावर घरीच उपचार करून ऑक्सिजन लावण्यात आले. मात्र दोन दिवसांपूर्वी त्रास वाढल्यानंतर सुर्वे यांना उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सुर्वे यांची बायपास झाली होती; शिवाय त्यांचे डायलिसिसही करावे लागत होते.

सुनील सुर्वे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक होते. १९९५ पासून ते नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. अभ्यासू असलेले सुर्वे हे महापालिका सभागृह दणाणून सोडत असत. त्यांच्या निधनाने संघटनेत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगितले. उल्हासनगरच्या मराठा पट्ट्यातील खंदे शिवसैनिक म्हणून ते ओळखले जायचे.

सुनील सुर्वे गेली अनेक वर्षे सर्वसामन्यांच्या प्रश्नांसाठी झटत होते. उल्हासनगर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील रस्त्याचे रुंदीकरण होण्यामागे त्यांचा मोठा वाटा आहे. सुनील सुर्वे यांनी उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापतिपदही भूषवले आहे. २०१७ मध्ये उल्हासनगर महापालिकेच्या महासभेत पाणीप्रश्नावर आक्रमक झालेल्या सुर्वेंनी उपायुक्त जमीर लेंगरेकर यांना पाण्याची बाटली फेकून मारल्याने ते चर्चेत आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER