‘ब्रिटनचा हाहाकार पाहता इकडे भारतात ताकही फुंकून प्या’, शिवसेनेचा मोदी सरकारला सल्ला

CM Uddhav Thackeray - PM Narendra Modi

मुंबई :- भारतासह जगभरातील सुमारे 40 देशांनी ब्रिटनच्या विमान सेवेवर बंदी आणली आहे. मात्र केवळ ब्रिटनच्या प्रवासावर निर्बंध घालून घातक रूप घेऊन आलेल्या नव्या कोरोनाला रोखता येईल काय?, असा सवाल करत आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या प्रत्येक प्रवाशाला क्वारन्टाईन करा आणि त्यांच्या कोरोनासंबंधी चाचण्या करा. ब्रिटनचा हाहाकार पाहता इकडे भारतात ताकही फुंकून प्यावे,असा महत्त्वाचा सल्ला दै. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने (Shivsena) केंद्र सरकारला (Central Govt) दिला आहे.

केवळ ब्रिटनची विमानसेवा बंद करुन कोरोनाला रोखता येईल काय? ब्रिटनमधून इतर देशांत जाणाऱ्या आणि ब्रिटिशांच्या संपर्कातून दुसऱ्या देशांद्वारे भारतात दाखल होणाऱ्या प्रवाशांतून हे संक्रमण होणार नाही का? इतर शे-दीडशे देशांचा गेले 15 दिवस आणि अजूनही ब्रिटन प्रवास सुरूच आहे. त्यामुळे केवळ ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांची चाचणी करूनच भागणार नाही तर आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या प्रत्येक देशी-विदेशी नागरिकाला विलगीकरणात पाठवून कोरोनाच्या नव्या स्ट्रेनशी संबंधित सर्व चाचण्या करणे आवश्यक आहे, असा महत्त्वाचा सल्ला आजच्या अग्रलेखातून सेनेने केंद्राला दिला आहे.

वर्षभरापूर्वी पहिल्या कोरोनाचा उद्रेक झाला त्यावेळी उशिरापर्यंत आंतरराष्ट्रीय विमान प्रवास सुरू ठेवण्याची चूक आपल्याला किती महागात पडली ते आपल्या समोर आहे. ब्रिटनमध्ये फैलावलेल्या नव्या घातक विषाणूचे महासंक्रमण रोखायचे असेल तर परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच ठोस पावले उचलणे आवश्यक आहे, असं मत अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

ब्रिटनमधील नव्या कोरोनाच्या अवताराची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर केंद्र सरकारने तत्काळ निर्णय घेत 31 डिसेंबरपर्यंत ब्रिटनमधून येणाऱ्या व जाणाऱ्या विमान सेवेवर बंदी घातली होती. मात्र बंदी घालण्यापूर्वीच्या 8-15 दिवस आधी जे तीसेक हजार प्रवासी ब्रिटनमधून हिंदुस्थानात दाखल झाले त्यापैकी काही प्रवाशांद्वारे या घातक विषाणूचे संक्रमण भारतातही झाले. ब्रिटनचा हाहाकार पाहता इकडे भारतात ताकही फुंकून प्यावे, अशी परिस्थिती असल्याचं अग्रलेखात म्हटलंय.

ब्रिटनमध्ये फैलावलेल्या नव्या घातक विषाणूचे महासंक्रमण रोखायचे असेल तर परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. कोरोनाच्या चिनी विषाणूने आधीच वर्षभरात होत्याचे नव्हते केले. त्यात कोरोनाचे हे नवीन ‘ब्रिटन रिटर्न’ महासंकट आ वासून उभे आहे. कोरोनाच्या (Corona) या नव्या अवताराला आळा घालावाच लागेल, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : इडीचे ऑफिस सध्या मोदींच्या घरातून चालतं, बच्चू कडूंची मिस्कील टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER