शिवसेनेने मुख्यमंत्री पदाचा दावा करून नये : रामदास आठवलेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला

ramdas-athwale

मुंबई :- युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा निवडणूक लढण्याचा निर्णय क्रांतिकारी असला तरी त्यांनी सध्या तरी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळेल अशी शक्यता नाही. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, असा सल्ला केद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एका वृत्त पत्राशी दिलेल्या मुलाखतीत युवा सेनेच्या प्रमुखांना दिला.
२०१४ च्या तुलनेत चांगले वातावरण आहे. या निवडणुकीत भाजप, सेना, रिपाइं आणि मित्रपक्षांना २५० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळेल. त्यामुळेच अजूनही इनकमिंग सुरू असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. वंचित बहुजन आघाडीच्या आव्हानावर बोलताना आठवले म्हणाले, वंचित आघाडीतून एमआयएमसह अनेक जण वेगळे होत आहेत. त्यात आणखी भर पडत जाईल. आव्हानाचा प्रश्नच नाही, उलट या आघाडीचा प्रयोग म्हणजे महाराष्ट्रात वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवण्याचा प्रयोग आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणानंतर अॅड. प्रकाश आंबेडकरांची ताकद वाढल्याची कबुली देऊन आठवले म्हणाले, त्या वेळी झालेल्या आंदोलनात आमचे ८०% कार्यकर्तेही सहभागी होते. मात्र श्रेय प्रकाश आंबेडकर यांना मिळाले. त्याचा त्यांच्या उमेदवाराला फायदा झाला. पण एवढ्या मतांवर सत्तेपर्यंत जाता येत नाही. वंचितमुळे बाबासाहेबांची रिपाइं मोडीत काढली जात आहे.

अॅड. प्रकाश आंबेडकर यांची संघटना बाबासाहेबांच्या विचाराच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियापासून दूर गेली असून त्यांनी रिपब्लिकन पक्ष मोडीत काढला आहे. बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष जिवंत ठेवण्याचा प्रयत्न फक्त मी करतोय. १९९६ मध्ये आम्ही एकत्र होतो तेव्हा आमच्या पक्षाला मान्यता मिळाली होती हा इतिहास असल्याचे आठवले म्हणाले.
आदित्य ठाकरे यांच्या वरळीतील उमेदवारीबाबत आठवले म्हणाले, आदित्य यांचा निवडणूक लढण्याचा निर्णय क्रांतिकारी आहे. पहिला ठाकरे निवडणूक रिंगणात उतरला आहे. त्यांची देशभरात उत्सुकता आहे, ते अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. वरळी आमचा बालेकिल्ला आहे. तेथून आदित्य लढत असल्याने त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असून ते मोठ्या फरकाने विजयी होतील, असेही ते म्हणाले.

सध्या सुरु असलेल्या ‘ईडी’च्या चर्चेबाबत आठवले म्हणाले, शरद पवार हे चाणाक्ष राजकारणी आहेत. त्यांचे काम नियोजनबद्ध व व्यवस्थित आहे. माझे त्यांच्याशी अनेक वर्षांचे संबंध आहेत. ईडीने चौकशी करावी असे कोणतेही काम ते स्वतः करणार नाहीत याची मला खात्री आहे. हजारे यांनीही त्यांना क्लीन चिट दिल्याचे ते म्हणाले.