दसरा उत्सवाचे सीमोल्लंघन करण्याचे श्रेय जाते संघाला आणि शिवसेनेला – संजय राऊत

Dussehra festival-Sanjay Raut-Shivsena-RSS

मुंबई : कोरोनामुळं (Corona crises) यंदाचा विजयादशमी उत्सव (Vijayadashami celebration) हा खुल्या मैदानात न होता सभागृहात होत आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेला संघाचा आणि शिवसेनेचा दसरा मेळावा सभागृहात होणार आहे. आणि यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊतयांनी (Sanjay Raut) आजच्या सामनातील रोखठोकमधून आपले मत व्यक्त केले आहे. दसऱ्याचे स्वरूप आता बदलत आहे. सीमोल्लंघनाचे प्रकारही बदलताना दिसत आहेत. दसऱ्याचा उत्सव हा राजेरजवाड्यांचा. त्यांच्या वैभवशाली स्वाऱ्या या दिवशी निघत. दसरा उत्सव मैदानात आणून सीमोल्लंघन करण्याचे श्रेय जाते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) आणि शिवसेनेला (Shivsena). शिवतीर्थावर पन्नास वर्षे बाळासाहेब ठाकरे यांनी विचारांचे सोने जनतेवर उधळत ठेवले. आज कोरोनामुळे सर्व शांत आहे. अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली आली आहे.

आजचा सामनातील रोखठोक…

आजचा दसरा नेहमीपेक्षा वेगळा आहे. कोरोनामुळे गणपती, नवरात्रीसारखे उत्सव थंडपणे पार पडले. देव, देवता आले आणि गेले ते कुणालाच कळले नाही. दसऱ्याच्या वैभवशाली शोभायात्रा निघणार नाहीत. सीमोल्लंघनाचे सोने लुटण्यासाठी एकमेकांच्या घरी जाणे, आलिंगने देणे होणार नाही. ज्यांना येथे फक्त धर्माचेच राज्य आणायचे होते व ज्यांनी त्यासाठी धर्मयुद्धाचे शंखनाद केले त्यांनाही आता पटले असेल, एका विषाणूने धर्माचा पराभव केला. विषाणू रोखण्यासाठी देवांनाही बंदी केले व भक्तांचा प्रवाहच गोठवला. त्यात सगळ्यांचेच सणवार संकटात आले. महाराष्ट्रात दसऱ्याचे महत्त्व मोठे. त्या काळी राजे, सरदार, संस्थापक दसऱ्याचा उत्सव साजरा करीत. त्या उत्सवात राजा आणि प्रजा एकत्र येत असे. कोल्हापुरातील शाहू महाराजांचा दसरा परंपरेने चालत आला. तो उत्सव आता कोरोनामुळे होणार नाही. सावंतवाडी संस्थानात ‘पेडणे’ येत असे. देशप्रभू हे पेडण्याचे राजे. कोकणातील या राजांचा मान आणि थाट वेगळाच. देशप्रभूंचे ‘पेडणे’ नंतर गोव्यात गेले, पण वैभवाच्या साक्षी त्यांचा राजवाडा देत असतो. राजा होता म्हणून दसऱ्याच्या स्वारीला अर्थ आला. तेथील राजवाड्यांत जुनी छायाचित्रे आहेत. देशप्रभूंचे स्वतःचे वस्तुसंग्रहालय आहे. जुन्या मिरवणुकीत मिरवलेल्या पालख्या आहेत. ‘‘या पालख्यांत बसून आम्ही दसऱ्याच्या स्वारीला निघत असू,’’ असे राजवाड्यातील लोक सांगत असतात.

भव्य शोभायात्रा

हिंदुत्वाचे राजकीय वारे वाहायला लागले तेव्हापासून दसऱ्याच्या भव्य शोभायात्रांचा बहर वाढला. म्हैसूरच्या महाराजांची दसऱ्याची स्वारी देशभर गाजत असे. तशी पेडण्याच्या वाड्यावरून निघणाऱ्या स्वारीकडेही गोवा, कोकणचे लक्ष असे. आजही दसऱ्याच्या दिवशी दुपारी 12 वाजता वाड्यातून पूर्वापार परंपरेने मिरवणूक निघते. पूर्वी मिरवणुकीच्या अग्रभागी हत्ती असत. हत्तीच्या पाठीवरच्या झुलीवर देशप्रभू घराण्याचे ऐश्वर्य झुले. त्यात घोडे होते. घोडेस्वार होते. पालखीतून मिरवत रावराजे जात. मेण्यातून स्त्रिया येत. गोव्यातील ही संस्थानी थाटाची मिरवणूक पाहण्यासाठी सर्व ठिकाणांहून लोक येत, असे वर्णन श्री. माधव गडकरी यांनी एके ठिकाणी केले आहे. मिरवणूक अखेर सर्वांची होई. लोक मिरवणुकीत सीमोल्लंघनास निघत. भगवतीचे मंदिर हे सर्वांचे श्रद्धास्थान. देवळाजवळ मिरवणूक आली की महाजन, सेवेकरी त्यात सामील होत. नंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होई. आजही पेडण्यात ते चित्र दिसते. सातारा, सांगली, कोल्हापूर अशा महाराष्ट्रातील राजघराण्यांचे दसरे साजरे होतात. गेल्या पाचशे वर्षांत दसऱ्याने अनेक सत्तांतरे केली. दसरोत्सव हा राजे-रजवाड्यांबरोबर या देशात जसा वाढला, त्याचबरोबर शौर्याचा उत्सव म्हणून साजरा केला गेला. पराक्रम गाजवून परत आलेल्यांना पदके देऊन त्यांचा गौरव करण्याची पद्धत राजघराण्यांच्या दसरोत्सवात होतीच.

विजयाचा उत्सव

दसरा म्हणजे विजयाचा उत्सव. पांडवांनी अज्ञातवासातून बाहेर आल्यानंतर याच दिवशी शमीच्या झाडाच्या ढोलीत ठेवलेली शस्त्रे बाहेर काढली होती. श्रीरामाने याच दिवशी लंकानरेश रावणाबरोबर युद्ध करण्यासाठी दक्षिणेस कूच केले. त्यालाही यश मिळाले. राजपूत सरदारही याच मुहूर्तावर लढाईवर निघत. मराठ्यांच्या स्वाऱ्याही याच दिवसापासून सुरू होत. पेशव्यांचा दरबार दसऱ्यालाच भरे व संस्थानिकांना मानाचे पोशाख देत असत. पेशव्यांना अधिकाराची वस्त्र देणारे छत्रपती शाहू महाराज. भवानी माता हीच भोसले घराण्याची कुलदेवता. छत्रपती शाहू त्यांच्या राज्यात दसरा दिमाखात साजरा करीत. पुढे नानासाहेब पेशव्यांनी मराठा राज्याचे प्रतीक म्हणून दसरा पुण्यात साजरा करण्याची प्रथा सुरू केली. मिरवणुका निघत. शमीच्या झाडांची पूजा होत असे. तोफा व बंदुकांच्या फैरी झाडून शस्त्र व शक्तीचे दर्शन घडवले जात असे. या सर्व परंपरा आज दिसत नाहीत. राजकीय पक्ष आपापल्या स्वतंत्रपणे मिरवणुका काढतात, पण 2020 साली तेसुद्धा दिसणार नाही.

मैदानातला दसरा!

लोकमान्यांनी घरातला गणपती सार्वजनिक केला. जनतेचा उत्सव बनवला तसा दसरा हा पेशवाईनंतर मैदानात साजरा करण्याचे काम दोन प्रमुख हिंदुत्ववादी संघटनांनी केले. पहिले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व दुसरी शिवसेना. पूर्वी राजेरजवाड्यांचे दसरोत्सव होत. त्यात विचार नव्हता. दसरा उत्सवात विचार आणि दिशा देण्याचे काम केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेनेच्या दसरा मेळाव्यांनी. नागपुरात संघाचा आणि मुंबईच्या शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा हा देशात आकर्षणाचा विषय ठरला. शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या अनेक लढायांच्या सिंहगर्जना दसरा मेळाव्यात केल्या, तशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागपूरच्या दसरा मेळाव्यांतून राष्ट्रीय विचारांना चालना दिली. आजही ती दिली जाते. दसऱ्याचा उत्सव म्हणजे प्रसन्नता. सीमोल्लंघन आता पूर्वीसारखे राहिले नाही. कारण आपट्याची पाने लुटण्यात नव्या पिढीस रस उरला नाही. देश लुटण्याचे सीमोल्लंघन सदासर्वकाळ सुरूच असते तेथे आपट्याच्या पानास कोण विचारणार! दसऱ्याच्या उत्सवात आजही पालख्या निघतात, सोने लुटतात, पण शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात विचारांचे सोने जनतेवर उधळणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कोठे आहेत? सोने लुटताना तोफगोळे सोडणारे, विरोधकांच्या गंडस्थळावर हल्ला करून दाणादाण उडवणारे बाळासाहेब ठाकरे हे ज्यांनी शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात पाहिले आहेत, त्यांनाच सीमोल्लंघन कशाला म्हणतात ते कळेल.

उत्तर प्रदेशात हाथरस बलात्कार प्रकरण घडले. एका वाल्मीकी समाजाच्या मुलीवरील बलात्कार, हत्या प्रकरणाने देशाच्या चारित्र्याची लक्तरेच बाहेर पडली. त्यानंतर तेथील हिंदू दलित समाज प्रचंड दहशतीखाली जगू लागला. आता बातमी आली उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील 250 दलितांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतर करणाऱ्यांत 65 वर्षांचा इंदर राम आहे. दिल्लीतील शहादरा येथे तो राहतो. हाथरस प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील हिंदू दलितांना सामाजिक बहिष्कारास सामोरे जावे लागले. बौद्ध धर्मात जातपात नाही. तेथे कोणी ठाकूर नाही, वाल्मीकी नाही. प्रत्येक जण मनुष्य आहे आणि सगळे जण बौद्ध आहेत. धर्मांतराशिवाय दुसरा मार्ग नव्हता असे इंदर राम सांगतात. अयोध्येत हिंदुत्वाचे राममंदिर उभे राहत आहे, पण इंदर ‘राम’ने हिंदू धर्मच सोडला. दसऱ्याला हिंदुत्वाच्या पालख्या मिरवल्या जातील, विचारांचे सीमोल्लंघन होईल, पण जाती प्रथेस कंटाळून हिंदू समाज धर्मांतर करीत आहे. पाकिस्तानातील हिंदूंची चिंता वाहणे हे राजकारण सोपे आहे. आपल्या डोळ्यांसमोर इंदर राम हिंदू धर्माचा त्याग करतोय. हा दसरा नेहमीपेक्षा खरेच वेगळा आहे. सर्व काही शांत आहे, पण हिंदू धर्म अस्वस्थ आहे. दसऱ्याच्या निमित्ताने त्याचे सीमोल्लंघन होऊ द्या! असेही राऊत यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER