घटना कोणाला शिकवता? ED चा वापर करून सरकार पाडता येईल, या अंधश्रद्धेतून आता बाहेर पडलं पाहिजे -शिवसेना

Sanjay Raut-fadnavis-patil.jpg

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shiv Sena Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varash Raut) यांना अंमलबजावणी संचनालयानं (ED) नवे समन्स बजावले आहेत. येत्या 5 जानेवारीला मुंबईतील ED कार्यालयात हजर राहावे, असे निर्देश वर्षा राऊत यांना देण्यात आले आहेत. त्यावरून शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.

शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या दैनिक ‘सामना’तून शिवसेनेनं भाजपवर आज पुन्हा टीकेची तोफ डागली आहे. भाजप नेत्यांवर अत्यंत बोचरी टीका करण्यात आली आहे. भारतीय राज्य घटनेचे भाजपकडून कसे उल्लंघन होत आहे आणि स्वत:च नवीन घटना तयार करून आगपाख ड करत असल्याची टीका करण्यात आली आहे.

ED ची भीती दाखवून घटनेवर बोट ठेवणारे भाजप नेत्यांना राज्यपाल नियुक्तं आमदारांच्या निर्णयावर मात्र त्याच घटनेचा विसर पडत असल्याचं सामना अग्रलेखात म्हटलं आहे. आजच्या सामना अग्रलेखात भाजपवर शिवसेनेने जहरी बाणांचा वर्षावच केलांय. त्यामुळे राज्यातील राजकिय वातावरण आता आणखिनच तापणार यात शंका नाही. ED वगैरेचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडता येईल, या अंधश्रद्धेतून आता बाहेर पडलं पाहिजं, असा टोला शिवसेनेनं भाजपला लगावला आहे.

‘कायद्याच्या अंमलबजावणीचा हेतू शुद्ध असेल तरच तो कायदा जनतेने पाळायचा असतो. बेकायदेशीर आदेश पाळणे हे नागरिकांच्या सनदेमध्ये बसत नाही. सीबीआय (CBI), ईडी (ED) सारख्या संस्थांचे अध:पतन सध्या जोरात सुरू आहे. हवाबाण थेरपीचा अतिरेक झाला की मेंदूनत सडकी हवा जाते. त्या पादऱ्या हवेच्या ढेकरा सध्या ज्यांना लागत आहेत त्यांचे नाव भाजप! भाजपच्या नव्या घटना समितीचा विजय असो डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागत घुसलेला बाण! हेच तुमचे भविष्य!’, अशी खोचक टीका शिवसेनेनं केली आहे.

सध्या राज्यात ED प्रकरण गाजत आहे. महाराष्ट्रातून भाजपची इडा-पीडा गेल्यापासून हे ED प्रकरण जोर धरू लागलं आहे. म्हणजे ED चा वापर करून भाजपविरोधकांना नमविण्यचे प्रयोग सुरू झाले आहेत. याच वातावरणाचा लाभ घेत EDस घाबरून भाजपच्या कळपात शिरलेल्या एका महात्म्यानं ठाकरे सरकार पडण्याचा नवा मुहूर्त दिला आहे. आता म्हणे मार्च महिन्यात काही झाले तरी सरकार पडणार! हा मुहूर्त यांनी ED पिडीच्या पंचागांतून काढला की त्यांना झोपेत दृष्टांत झाला? असा खोचक टोला भाजपला लगावला.

एक मात्र खरे, महाराष्ट्रातील भाजपवाले सत्ता स्थापनेसाठी त्या EDवर फारच विसंबून राहिले आहेत. EDच्या वतीनं भाजप कार्यालयात हजारेक नोटिसा जणू छापूनच ठेवल्या आहेत. व कोणी सत्य बोलू लागले की, त्याच्या नावावर ती नोटीस पाठवून द्यायची, असा एक जोडधंदा सध्या सुरू असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. EDची नोटीस वगैरे आली की, चौकशीसाठी संबंधिताने जायलाच हवे. नव्हे, कायद्याचा सन्मान हा व्हायलाच पाहिजे. कायदा सगळ्यांसाठी समान. दुसरे म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणतात तेदेखील बरोबरच आहे, कर नाही त्यास डर कशाला? हे त्यांचे सांगणे अगदी बरोबर आहे. पण या नोटिसा देशभरात फक्त भाजपविरोधकांनाच का येत आहेत? असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

देशात फक्त भाजपवालेच रोज गंगास्नान करतात व उर्वरित लोक गटारस्नान करतात असे काही आहे काय? शिवसेनेच्या बाबतीत सांगायचे तर कर नाही तर डर नाही वगैरे ठीकच, पण करून सवरून नामानिराळे राहणाऱ्यांची आमची अवलाद नाही. जे केले त्याची जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाबरीचा विध्वंस! तेथे रणातून पळून गेले ते कर आणि डरचे दाखले देत आहेत. हा विनोदच म्हणावा लागेल, असा टोला देखील देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

चंद्रकांत पाटलांना घटनेची इतकी फिकीर कधीपासून लागून राहिली? तुम्हाला घटना मान्य नाही काय, हा प्रश्न त्यांनी राजभवनाच्या दारात उभे राहून जोरात विचारायला हवा. घटनेची सगळ्यात जास्त पायमल्ली सध्या कुठे होत असेल तर ती घटनेच्या तथाकथित रखवालदाराकडून. मागच्या जून महिन्यात राज्यपालनियुक्त 12 जागा रिकाम्या झाल्या. त्या जागांची शिफारस राज्याच्या मंत्रिमंडळाने केली. राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारशी मान्य करणे हे राज्यपालांना बंधनकारक असल्याचे आपली घटनाच सांगते. मग इतके महिने उलटून गेले तरी राज्यपालनियुक्त जागा रिकाम्या का ठेवल्या?, असा सवालही शिवसेनेनं केला आहे.

ठाकरे सरकार पडण्याचे सर्व मुहूर्त, प्रयोग 2020 मध्ये फसले आहेत. त्यामुळे राज्यपालांच्या मनातले सरकार येत्या पाच-पंचवीस वर्षांत तरी महाराष्ट्रात येण्याची लक्षणे दिसत नाहीत. मग वाट कसली पाहताय? कुणा कुडमुड्या ज्योतिषाने मार्च-एप्रिलचा मुहूर्त दिला असेल तर तो मूर्खपणाच ठरेल. त्यामुळे ईडी वगैरे काय ते भाजपवाल्यांनी शिकविण्याची गरज नाही. शरद पवार असतील नाहीतर संजय राऊत. खडसे, सरनाईक असतील नाहीतर महाविकास आघाडीतील इतर कोणी, त्यांच्यावरील कारवाया म्हणजे विकृतीचा कळस आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा…कोरोनाची लक्षणं जाणवत असल्याचा एकनाथ खडसेंचा दावा, ED समोर हजर होणार नाही

महाराष्ट्रातही जे लोक ईडीचे गुणगान करून EDची नोटीस मिळताच कसे चौकशीला सामोरे जायला हवे असे मार्गदर्शन करीत आहेत, त्यांच्या पार्श्वभागात ईडी चौकशीचा बांबू घुसताच लंगड्या तंगडय़ांनी हे बोलभांड भाजपात सामील झाले. भाजपमध्ये सामील होताच असे सर्व लोक शुद्ध करून घेतले जातात व ED याकामी पौरोहित्याचे काम करीत असते, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER