राहुल गांधींची कॉलर पकडणे हा तर लोकशाहीचा ‘गँगरेप’ – संजय राऊत

Sanjay Raut-Rahul Gandhi.jpg

मुंबई : हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणातील (Hathras rape and murder case) पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) पायी चालत निघाले होते. त्यावेळी उत्तरप्रदेश पोलिसांनी राहुल गांधी यांच्याशी धक्कामुक्की करत कॉलर पकडल्याचा व्हिडिओ माध्यमांमध्ये झळकला. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

पोलिसांनी राहुल गांधींसोबत केलेली वर्तणूक म्हणजे लोकशाहीचा गँगरेप असल्याची संतप्त प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे. काल जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे. राहुल गांधी यांना मिळालेल्या वागणुकीचा निषेध करतो, असं संजय राऊत म्हणाले.

राऊत यांनी म्हटलं की, काँग्रेससोबत आमचे मतभेद असू शकतात. एखादा राष्ट्रीय नेता पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात असल्यास काही अडचण होती. त्याठिकाणी जमावबंदीचा आदेश होता हे मी समजू शकतो. मात्र ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींसोबत धक्काबुक्की केली गेली, ते ठीक नव्हतं. त्याचदेशात कोणीही समर्थन करणार नाही. राहुल गांधी इंदिरा गांधींचे पणतू आणि स्वर्गीय राजीव गांधी यांचे पुत्र आहे हे विसरून चालणार नाही. या लोकांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली आहे. मात्र त्याठिकाणी पोलिसांनी राहुल गांधींसोबत केलेली वर्तणूक म्हणजे लोकशाहीचा गँगरेप आहे. या गॅंगरेपचीही चौकशी व्हायला हवी. अशी मागणीही राऊत यांनी केली.

हाथरसमध्ये पीडितेवर रेपनंतर हत्या केली गेली. त्यात तिचा मृत्यू झाला. तिच्या अंत्यसंस्कार देखील परिवाराला करु दिले नाहीत. जर तुम्ही पीडितेचा आवाज ऐकू शकत नाहीत, पीडित परिवाराचा आवाज दाबताय तर तुम्हाला ‘बेटी बचाओ’ ची घोषणा करण्याचा अधिकार नाही, असं संजय राऊत म्हणाले होते. तसेच मुंबईत कंगणा रनौतच्या अवैध बांधकामावर केलेल्या कारवाईमुळे अनेकांनी शिवसेनेचा विरोध केला होता. आता या लोकांनी पीडितेच्या न्यायासाठी पुढे यावे असा सणसणीत टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER