संजय राठोडांची कारकीर्द ; माणिकराव ठाकरेंचा पराभव, क्रीडामंत्र्यांना हरवलं, खडसेंविरोधातही पंगा

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Case) प्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) आपल्या आमदराकीचा तसेच मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे जाऊन ते महंतांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते आपला निर्णय जाहीर करतील, अशी माहिती पोहरादेवी येथील महंत जितेंद्र महाराज (Jitendra Maharaj) यांनी दिली आहे.

संजय राठोड बंजारा समाजातून येतात. शिवसैनिक म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या संजय राठोड यांनी काँग्रेसच्या गडामध्येच कामाला सुरुवात केली. यानंतर त्यांना यवतमाळचं शिवसेना जिल्हाध्यक्ष पदाही मिळालं. 1997 मध्ये वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी ते यवतमाळ शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष झाले. यानंतर त्यांनी झंझावाती पक्ष बांधणी करत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेना रुजवली. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव ठाकरे (ManikRao Thackeray) यांचा दारुण पराभव केला आणि काँग्रेसच्या गडावर भगवा झेंडा फडकावला.

2004 मध्ये तत्कालीन गृह राज्यमंत्री असलेल्या माणिकराव ठाकरेंचा पराभव करत ते पहिल्यांदा विधानसभेत पोहचले. 2009 मध्ये दारव्हा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन दिग्रस मतदार संघ अस्तित्वात आला. या मतदारसंघातून राठोड यांनी विलासरावांच्या मंत्रिमंडळात असलेल्या तत्कालीन क्रीडा मंत्री संजय देशमुख (Sanjay Deshmukh) यांचा पराभव केला. संजय राठोड यांनी 2014 मध्ये आमदारकीची हॅटट्रिक साधली. राष्ट्रवादीचे नेते वसंत घुईखेडकर (Vasant Ghuikhedkar) यांचा त्यांनी पराभव केला.

राज्यमंत्र्यांना काम करू दिले जात नाही, असं म्हणत राठोड यांनी तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना थेट आव्हान दिले होते .त्यासाठी त्यांनी राजीनाम्याचं अस्त्र वापरलं होते .

2019 मध्ये संजय राठोड यांनी चौकार मारला. भाजपचे बंडखोर उमेदवार संजय देशमुख यांचं तगडं आव्हान त्यांच्यापुढं होतं (अपक्ष म्हणून रिंगणात होते). अशा परिस्थितीतही तब्बल 63 हजार मताधिक्यांनी ते विजयी झाले. त्यामुळे राठोड यांची मंत्रीपदासाठी वर्णी लागली. फडणवीस सरकारमध्ये ते महसूल राज्यमंत्री होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER