सामनाच्या अग्रलेखावरून पाथरीकर नाराज, आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत

Shivsena samnaa article on pathari sai birthpalce

मुंबई : साईबाबा यांच्या जन्मस्थळावरुन सुरु झालेल्या वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (20 जानेवारी) शिर्डी येथील शिष्टमंडळाशी चर्चा केली आणि त्यात तीर्थक्षेत्र म्हणून पाथरीचा विकास करु असे आश्वासन दिल्याचे शिर्डीकरांनी सांगितलं. तर आज सामनातून याबाबत माहिती देत शिर्डीचा वाद शमला असल्याचे सांगण्यात आले आहे.

संत साईबाबांच्या जन्मस्थानावरून कोणताही वाद मुख्यमंत्र्यांनी निर्माण केला नाही. पाथरी आणि शिर्डीकरांनीही तो करू नये. संतांचे तेज अशाने कमी होईल. जन्मस्थानाच्या वादाचे गालबोट त्याला लागू नये . या वादासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने लक्ष घातले, शासनाची भूमिका स्पष्ट केली. दोन्ही बाजूंचे त्यामुळे समाधान झाले आणि एक विनाकारण उद्भवणारा वाद लगेच शमला. शेवटी साईबाबांचे अवतारकार्य, त्यांनी दिलेली शिकवण महत्त्वाची, असे आजच्या सामनातून सांगण्यात आले आहे. आणि यावरून पाथरीकर चांगलेच संतापले असून, आक्रमक पवित्र्याच्या तयारीत आहे.

शिर्डीकरांचे समाधान जरी झाले असले तरी आज पाथरीकर आपली भूमिका ठरवणार आहेत. पाथरीमधील साई मंदिरात आज दुपारी बारा वाजता महाआरतीचं आयोजन करण्यात आले आहे. या महाआरतीला जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि सर्व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अद्यापही पाथरीकरांना चर्चेचे निमंत्रण न दिल्यामुळे पाथरीकर आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.