कर्नाटकात कॉंग्रेसचे सरकार असते तर महाराष्ट्रात भाजपने नक्कीच धुमाकूळ घातला असता- शिवसेना

Shivsena Saamana Editorial

मुंबई : बेळगाव (Belgaum) जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारने (Karnataka Congress Govt) रातोरात हटविला. या मुद्यावरून शिवसेनेने (Shivsena) आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपावर बोचरी टीका केली आहे. कर्नाटकात भाजपाचे (BJP) सरकार आहे. तेच तेथे कॉंग्रेसचे सरकार (Congress govt) वगैरे असते तर महाराष्ट्रात सांगली, साताऱ्यात तरी भाजपाने नक्कीच धुमाकूळ घातला असता. अशी टीका शिवसेनेने ‘सामना’तून केली आहे.

तसेच भाजपाची ही नकली शिवभक्ती काय कामाची? असा घणाघातही शिवसेनेने ‘सामना’तून केला आहे. अयोध्येत पंतप्रधान मोदी रामजन्मभूमीवर शिवरायांचा जयजयकार करतात; पण कर्नाटकात जणू बाबरीच पाडल्याच्या ऐटीत शिवरायांचा पुतळा हटवला जातो. असे शिवसेनेने आजच्या ‘सामना’त म्हटले आहे.

आजचा सामना –
कोणत्याही पक्षाचा आमदार किंवा मुख्यमंत्री हे छत्रपती शिवरायांपेक्षा मोठे नाहीत. त्यामुळे कातडीबचाव फुटकळ खुलासे करण्यात अर्थ नाही. शिवरायांचा पुतळा रातोरात हटवण्याचा प्रकार चिंताजनक आहे. त्याहीपेक्षा महाराष्ट्रातील भाजपा ‘शिवभक्तां’चे मौन चिंताजनक आहे. तिकडे अयोध्येत पंतप्रधान मोदी रामजन्मभूमीवर शिवरायांचा जयजयकार करतात; पण कर्नाटकात जणू बाबरीच पाडल्याच्या ऐटीत शिवरायांचा पुतळा हटवला जातो.

कर्नाटकात काँगेसचे वगैरे सरकार असते तर महाराष्ट्रात सांगली, साताऱ्यात तरी भाजपाने नक्कीच धुमाकूळ घातला असता. आता कसे थंड पडले आहेत ते बघा! ही नकली शिवभक्ती काय कामाची? असा सवाल शिवसेनेने सामनातून केला आहे.

सध्याचे भाजपशासित राज्यकर्ते बोलतात एक व करतात दुसरेच. युगपुरुष, देवादिकांच्या नावाचा वापर ते राजकीय स्वार्थासाठीच करीत असतात. महाराष्ट्रातील मागच्या निवडणुकीत छत्रपती शिवाजीराजांचे आशीर्वाद आपल्यालाच आहेत असा प्रचार त्यांनी केला; पण त्यांच्या कार्यकाळात शिवरायांच्या स्मारकाची वीट रचली गेली नाही. अशा अनेक सोंगाढोंगांच्या गोष्टी सांगता येतील.

यांचे शिवरायप्रेम हे ढोंग आहे हे सिद्ध करणारी दुर्घटना बाजूच्या कर्नाटक राज्यात घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारने रातोरात हटविला. ५ ऑगस्ट रोजी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत जाऊन राममंदिराचे भूमिपूजन केले. रामजन्मभूमीचा वनवास त्यांनी कायमचा संपवला. देशातील नव्हे, तर जगभरचा हिंदू त्यामुळे खूश जाहला. शिवाजीराजांनी जगातले पहिले हिंदवी स्वराज्य निर्माण केले.

हिंदूराष्ट्र कल्पनेचे जनक म्हणून छत्रपती शिवाजीराजांनाच मानायला हवे. त्या अर्थाने शिवराय हे एकमेव हिंदुपदपातशहा आहेत. हिंदूंवरची सर्व आक्रमणे शिवरायांनी तलवारीच्या बळावर मोडून काढली हे सत्य अयोध्येत नरेंद्र मोदींनी स्वीकारले. म्हणूनच रामजन्मभूमीवर मंदिराचे भूमिपूजन करताना पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे मनापासून स्मरण केले; पण पंतप्रधान छत्रपती शिवरायांपुढे नतमस्तक होतात व कर्नाटकात त्यांचे कानडी मावळे रात्रीच्या अंधारात शिवरायांचा पुतळा हटवतात याचा मेळ कसा लावायचा?

पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येतील भाषणात भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवरायांचे स्मरण केले हे कर्नाटकातील शिवद्रोहींच्या कानावर गेले नाही काय? अयोध्येत श्रीरामास तंबूतून मंदिरात नेण्याचा सोहळा पार पडला, तर कर्नाटकात शिवरायांचा पुतळा चौथऱ्यावर हटवण्याचा रावणी सोहळा पार पडला. बेळगावच्या मनगुत्ती गावात जे घडले त्याचा धिक्कार सर्वत्र होत आहे. कर्नाटक सरकारचे सीमा भागातील मराठी बांधवांशी भांडण आहेच.

ते राहीलच. मराठी बांधवांवर तेथे रोजच जुलूम, अत्याचार होत आहे; पण या भांडणाचा डंख त्यांनी शिवरायांवर काढून स्वतःचेच हसे करून घेतले. मराठी माणसांची डोकी फोडून उपयोग नाही. मरगट्टा हटत नाही, ‘‘बचेंगे तो और भी लढेंगे’’ म्हणत तो मैदानात दटून आहे. त्यामुळेच चिडून कर्नाटक सरकारने ‘‘जय शिवाजी, जय भवानी’’ घोषणांची प्रेरणा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाच हटवून टाकला.

याआधी बेळगाव महापालिकेवरील शिवरायांचा आणि हिंदुत्वाचा भगवा ध्वज उतरवून पायदळी तुडवण्याचे पातक कर्नाटकात झालेच आहे. आता शिवरायांना हटवले. जो पक्ष व सरकार शिवरायांचा असा द्वेष करते ते राज्य हिंदुत्ववादी कसे?

मनगुत्ती ग्रामपंचायतीची रीतसर परवानगी घेऊन हा शिवरायांचा पुतळा उभारला. त्यामुळे गावात वाद झाला म्हणून पुतळा जप्त केला. ही कर्नाटक सरकारची बतावणी बरी नाही. वाद झाला असेल तर वाद करणाऱ्यांवर कारवाई करा. एरवी सीमा बांधवांची डोकी फोडताच ना? पण कर्नाटक सरकारने स्थानिक वादाचे कारण देऊन शिवरायांचा पुतळा हटवला. त्यामुळे वाद झाला की वाद निर्माण केला, हा प्रश्न पडतो. गावात वाद झाला म्हणून शिवरायांचा पुतळाच हटवणे हा मार्ग नव्हे; पण कर्नाटक सरकारने तो हटवला.

आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत बेळगावातले लोक रस्त्यांवर उतरले व त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटू लागले तेव्हा तेथील सरकारचे सरकलेले डोके ठिकाणावर आले व पुतळा आठ दिवसांत पुन्हा बसवतो, असे सांगितले. या सर्व प्रकरणात महाराष्ट्रातील शिवप्रेमी भाजपा पुढारी तोंडी मिठाच्या गुळण्या घेऊन चिडीचूप का राहिले?

एरवी तुम्ही शिवरायांच्या वंशजांना तुमच्या पक्षात घेता, त्यांना पदे देता, त्याचा राजकीय स्वार्थासाठी गवगवा करता. मात्र आता कर्नाटकात तेथील सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा अपमान करते तरी तुम्ही गप्प कसे राहता? शेवटी आपल्या सगळ्यांचे कूळ आणि मूळ छत्रपती शिवराय आहेत आणि त्यांचा कोणी अपमान करीत असेल तर आपले रक्त उसळून यायलाच हवे;

पण तुम्ही गप्प आहात. म्हणजेच तुमचे शिवप्रेम खोटे आहे. ते ढोंग आहे. या मंडळींचे शिवरायांबाबत ढोंग कसे ते पाहा. मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे मनगुत्तीप्रमाणेच शिवरायांचा पुतळा हटविण्याचा प्रकार झाला होता. तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मध्यप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांना थेट इशारा देत सांगितले होते की, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही.

मध्यप्रदेश सरकारने शिवरायांची माफी मागावी व पुतळा जेथे होता तेथेच बसवावा.’’ इतकेच काय, महाराष्ट्रातील काही भाजपा पदाधिकारी तेव्हा शिवरायांचा अपमान झाला म्हणून छिंदवाड्यात जाऊन आंदोलन करण्याच्या तयारीत होते; पण आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना ना इशारा ना धिक्कार! शिवप्रेमी जनता तर लढतेच आहे; पण या लोकांचे काय?

देवेंद्रजी म्हणतात, ‘‘जेथे मनगुत्तीत पुतळा हटवला तेथे म्हणे काँगेसचे आमदार आहेत.’’ आमदार कुणाचाही असू द्या, राज्यात भाजपाई येडुरप्पांचे राज्य आहे व प्रशासनाच्या हुकुमाशिवाय शिवरायांचा पुतळा हटवू शकत नाही हे महाराष्ट्रात पुण्यात दादोजी कोंडदेवांचा पुतळा रात्रीच्या अंधारात हटवताना सगळ्यांनी पाहिले. कोणत्याही पक्षाचा आमदार किंवा मुख्यमंत्री हे छत्रपती शिवरायांपेक्षा मोठे नाहीत. त्यामुळे कातडीबचाव फुटकळ खुलासे करण्यात अर्थ नाही. शिवरायांचा पुतळा रातोरात हटवण्याचा प्रकार चिंताजनक आहे. त्याहीपेक्षा महाराष्ट्रातील भाजपा ‘शिवभक्तां’चे मौन चिंताजनक आहे. अशा शब्दांत शिवसेनेने भाजपला आजच्या ‘सामना’तून सुनावले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER