प्रताप सरनाईक यांचा दणदणीत विजय

प्रताप सरनाईक

ठाणे (प्रतिनिधी) :  गेल्या विधानसभेत केवळ 10 हजारांची आघाडी घेऊन निसटता विजय मिळवलेल्या शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांनी या निवडणुकीत मात्र तब्बल ८३ हजार ७७२ हजार मतांची आघाडी घेऊन विजयी मिळवला आहे . या निवडणुकीला महायुती असल्याने तसेच समोर तुल्यबळ उमेदवार नसल्याने प्रताप सरनाईक यांचा दणदणीत विजय झाला असून त्यांनी विजयाची हायट्रिक केली आहे .सरनाईक यांना एकूण १ लाख १७ हजार २८९ मते मिळाली असून दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस तर तिसऱ्या क्रमांकावर मनसे राहिली . मनसेच्या संदीप पाचंगे यांना २१ हजार ७१ मते मिळाली असून काँग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांना ३३ हजार ५१७मते मिळाली .

ओवळा-माजीवडा मतदार संघाची मतमोजणी ठाण्यातील पोखरण रोड नं 2 येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे झाली . सकाळी 8.30 ला सुरू होणाऱ्या मतमोजणीला पावणे नऊ वाजता सुरूवात झाली .पहिल्यांदा मीरा-भाईंदर क्षेत्रातील मतमोजणी करण्यात आली . यामध्ये प्रताप सरनाईक यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती .पहिल्या फेरीपासून सरनाईक यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली . सुरुवातीला मीरा-भाईंदरचा काही भाग हा या मतदार संघात येत असल्याने त्या क्षेत्रातील मत मोजणीला सुरुवात करण्यात आली . 15 व्या फेरीपर्यंत त्यांनी ४६ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याचा आकडा पार केला होता . त्यानंतर ठाण्याच्या मतमोजणीला सुरुवात केल्यानंतर ठाण्यातही त्यांना सुरुवातीपासूनच आघाडी मिळाली . शेवटच्या 31व्या फेरीअखेर त्यांनाव ८३ हजार ७७२ मतांची आघाडी मिळून त्यांनी दणदणीत विजय मिळवला .

ही बातमी पण वाचा :   महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ निकाल

या मतदार संघात तिरंगी लढत होईल असे चित्र निवडणुकीपासूनच तयार करण्यात आले होते .मात्र हे सर्व अंदाज फोल ठरले असून लागलेल्या निकालानंतर या मतदार संघात एकतर्फी लढत पाहायला मिळाली .या मतदार संघात मनसेचे संदीप पाचंगे तर काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांना म्हणावी तशी मते मिळाली नाही. याशिवाय या मतदार संघात काही प्रमाणात दलित मतदार असताना देखील वंचित बहुजन आघाडीचा देखील काहीही परिणाम झाला नाही .वंचित आघाडीच्या वतीने एड. किशोर दिवेकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते .त्यामुळे अपेक्षेप्रमाणेच प्रताप सरनाईक यांचा विजय झाला असून महाराष्ट्रात जास्त मताधिक्य घेणाऱ्यामध्ये सरनाईक यांचा समावेश आहे.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

उमेदवारांना मिळालेली मते –
प्रताप सरनाईक ( शिवसेना ) – १लाख १७ हजार २८९
विक्रांत चव्हाण ( काँग्रेस ) – ३३ हजार ५१७
संदीप पाचंगे (मनसे ) – २१ हजार ७१
नोटा – ६ हजार ४७
सरनाईक यांना मिळालेली मतांची आघाडी – ८३ हजार ७७२

माजी महापौरांना काढले मतमोजणी केंद्राच्या बाहेर –
मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल घेऊन जाण्यावररून पोलिसांमध्ये आणि माजी महापौर एच एस पाटील यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली .मोबाईल आतमध्ये आनलाच कसा यावरून पोलिसांनी एच एस पाटील यांना चांगलेच खडसावले .या सर्व प्रकारानंतर त्यांना मतदान मोजणी केंद्रातून बाहेर जाण्यास सांगितल्यानंतर हा वाद निवळला . त्यांच्यासोबत एका काय्कर्त्याला देखील मतमोजणी केंद्रच्या बाहेर जावे लागले . काही वेळांनंतर सरनाईक यांच्या समर्थकांना देखील पोलिसांच्या दमदाटीला सामोरे जावे लागले असल्याने प्रताप सरनाईक देखील पोलिसांवर वैतागले होते.

विकासकामांना लोकांनी मतदान केले –
गेल्या निवडणुकीमध्ये केवळ 10 हजार मतांनी निवडून आलो त्याचे शल्य माझ्या आणि मतदारांमध्ये होते . या निवडणुकीत जवळपास 1 लाखांची मतांची आघाडी घेऊन मला जिंकून आणल्याने त्यांचे उपकार कधीही न विसारण्यासारखे आहे .महाराष्ट्रातील फार मोजक्या लोकांना एवढे मताधिक्य मिळाले असून यामागे बाळासाहेब ठाकरे ,शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकार्य आहे . उद्धव ठाकरे यांनी न मागता खूप काही दिले असून मंत्रिपदाची कोणतीही अपेक्षा नाही .मतदार संघातील ट्रॅफिल आणि पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार
प्रताप सरनाईक , विजयी उमेदवार (शिवसेना )

मतदारांचा कौल मान्य –
मतदारांनी जो कौल दिला आहे तो मान्य आहे . उमेदवारी घोषित करण्याला वेळ झाला असल्याने फार कमी कालावधी प्रचारासाठी मिळाला. मात्र जे मतदान झाले त्यावर मतदारांचे आभार. निवडणूक खर्च जेवढा करायचा असतो तेवढाच खर्च केला असल्याने हे मतदान खरे मतदान झाले आहे . पुढच्या वेळी आणखी जोमाने तयारी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार –
संदीप पाचंगे , (मनसे )

कमी कालावधीत चांगले मतदान –
प्रचार करण्यासाठी फार कमी कालावधी मिळाला. मात्र ज्या ३३ हजार मतदारांनी मला आणि काँग्रेसला मतदान केले त्या सर्व मतदारांचे आभार. ३३ हजार मतदान झाले असले तरी कोंग्रेसचे मतदान वाढले आहे . त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराचे मतदान घटले असून भविष्यात आणखी जोमाने लढू .
विक्रांत चव्हाण ( कोंग्रेस )