
कोल्हापूर : सीमा भागातील मराठी बांधवांच्या भावनांना दुखावणारा लाल-पिवळा ध्वज त्वरित हटावावा, अशी मागणी करत बेळगावमध्ये जाऊन आम्ही भगवा ध्वज फडकावणारच, असा निर्धार करुन शिवसैनिकांनी (Shivsena) बेळगावकडे कूच केली आहे.
बेळगाव महापालिकेसमोर (Belgaum Municipal Corporation) कन्नक रक्षक संघटनेने लाल पिवळा ध्वज बेकायदेशीररित्या लावला आहे. हा ध्वज तात्काळ हटवण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने मोर्चा आयोजित केला होता. मात्र या मोर्चाला बेळगाव जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर ठरल्याप्रमाणे तमाम शिवसैनिक बेळगावमध्ये दाखल होणार आहेत. आम्ही जिल्हा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून भगवा फडकवणारच, असा निर्धार शिवसेनेने केला आहे.
शिनोळी या गावातून भगवा झेंडा घेऊन शिवसैनिकांनी बेळगावकडे कूच केली आहे. मात्र शिवसैनिकांना कर्नाटक पोलीस परवानगी देणार का?, असा मोठा प्रश्न आहे. कारण मागील काही आंदोलने, मोर्चे पाहता मराठी भाषिकांना तसंच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांविरोधात कर्नाटक पोलिस दडपशाही करत आलेलं आहे. चंदगड तालुक्यातील शिनोळी गावापासून शिवसेनेचे आंदोलन सुरु होणार आहे. दुपारच्या दुपारी 12 च्या सुमारास शिवसैनिक बेळगावमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिवसेनेचा बेळगावातील मोर्चाच्या पार्श्वभूमी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. कोगनोळी टोलनाक्यावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, प्रत्येक वाहनाची तपासणी करूनच प्रवेश दिला जात आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला