पंतप्रधानांच्या उत्तरे न देण्याच्या कृतीचे शिवेसेनेकडून समर्थन

नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रपरिषदेत पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही उपस्थिती होती; पण त्यांनी पत्रकारांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. ही पत्रकार परिषद पक्षाध्यक्षांची असल्याने पक्षशिस्तीनुसार मी उत्तरे देणे योग्य नाही, असे कारण त्यांनी दिले. यावरून त्यांच्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडले . मात्र शिवसेनेने मोदींच्या कृतीचे समर्थन केले आहे.

ती अमित शहांची पत्रकार परिषद होती आणि मोदी त्या पत्रकार परिषदेला पक्ष कार्यकर्ता म्हणून उपस्थित होते, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. त्यांनी विविध माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान विविध घटकांशी त्यांच्या भाषणांमधून संवाद साधतात. बोलण्यापेक्षा काही वेळा गप्प बसणे योग्य असते, असे राऊत म्हणाले. केदारनाथासारख्या मंदिरांना भेट देणं ही हिंदू संस्कृती आहे, राजकारण नाही, असेही राऊत म्हणाले.

ही बातमी पण वाचा : दगडात देव मानणारा नेता कुठं अन् रयतेलाच देव मानणारा नेता कुठं- राष्ट्रवादी काँग्रेस

पंतप्रधान मोदी पत्रकार परिषदेला उपस्थित असताना सर्वच प्रश्नांची उत्तरं शहांनी दिली. पंतप्रधानांना विचारण्यात आलेला एक प्रश्न त्यांनी मोठ्या खुबीनं शहांकडे टोलवला. ‘मी पक्षाचा शिस्तप्रिय सैनिक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पक्षाचे अध्यक्ष म्हणून शहाच देतील’ असं मोदी म्हणाले.

त्यानंतर पुन्हा एकदा एका पत्रकारानं एका प्रश्नावर मोदींची प्रतिक्रिया विचारली. त्यावर प्रत्येक प्रश्नाला पंतप्रधानांनी उत्तर देण्याची आवश्यकता नाही, असं शहांनी म्हटलं. सत्तेवर आल्यापासून गेल्या पाच वर्षांतील त्यांची ही पहिलीच पत्रकार परिषद असल्याने कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली असल्याने मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे देतील अशी अपेक्षा होती; मात्र तसे झाले नाही.