संजय राऊत सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याच्या तयारीत

Sanjay Raut & Farmer Protest

मुंबई :- प्रजासत्ताकदिनी दिल्लीत उसळलेल्या रोषानंतर आता दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला वेगळे वळण लागले आहे. अशातच आता शिवसेना या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी सरसावली आहे. त्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याच्या तयारीत आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपण दिल्लीत आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याच्या विचारात असल्याचे राऊत यांनी सांगितले. यासंदर्भात मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि दिल्लीतील नेत्यांशी चर्चा केली आहे.

या चर्चेवेळी शिवसेनेने शेतकऱ्यांना भेटून त्यांच्यापर्यंत आपल्या भावना पोहचवणे गरजेचे असल्याचा मतप्रवाह समोर आला. त्यामुळे मी सोमवारी दिल्लीत गेल्यानंतर सिंघू सीमेवर शेतकऱ्यांना भेटण्याचा विचार करत आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आजच्या सर्वपक्षीय बैठकीत शेतकऱ्यांशी चर्चेला तयार आहोत, ही घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. पंतप्रधानांनी ही भूमिका ६० दिवसांपूर्वीच घ्यायला पाहिजे होती.

सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात फक्त एका फोन कॉलचे अंतर असल्याचे म्हणाले. मग पंतप्रधान मोदी यांनीच पुढाकार घेऊन शेतकरी नेत्यांना फोन करावा. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून आश्वासन दिले तरच या आंदोलनावर तोडगा निघेल, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. शेतकरी नेते आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये पंतप्रधानपदाविषयी आदर आहे. त्यामुळे ते मोदींचा शब्द डावलणार नाहीत, असेही राऊत यांनी म्हटले.

ही बातमी पण वाचा : प्रभू राम हा काही राजकारणाचा विषय नाही ; राज ठाकरेंना आम्ही मार्गदर्शन करू – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER