नितेश राणेंच्या आरोपांवर शिवसेनेचे जोरदार प्रत्युत्तर

Nitesh Rane

मुंबई :- भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील कोरोनाच्या (Corona) स्थितीवरून ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारवर आरोप -प्रत्यारोप करीत असतात. त्यांच्या आरोपावर शिवसेनेचे (Shivsena) कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी प्रथमच जोरदार उत्तर दिले आहे. नाईक यांनी लांबलचक प्रसिद्धिपत्रक काढून राणेंच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले.

स्वत:च्या हॉस्पिटलचा व्यवसाय वाढविण्यासाठी व राजकीय फायद्यासाठी नितेश राणे व त्यांचे भाजपचे सहकारी सरकारी आरोग्य व्यवस्थेची बदनामी करत आहेत, असा घणाघात नाईक यांनी केला आहे.

शिवसेनेचे आमदार नाईक यांचे प्रसिद्धिपत्रक
गेले सात ते आठ महिने नितेश राणे व त्यांचे सहकारी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाची बदनामी करत आहेत. वास्तविक अनेक रुग्ण जिल्हा रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत. त्यात माझ्यासह इतर सामान्य नागरिक, व्यापारी व उद्योजक आहेत. नितेश राणेंचे अनेक पदाधिकारी, इंजिनीअरिंग कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा याच रुग्णालयात उपचार घेतले आहेत, असा दावा नाईक यांनी केला आहे.

जिल्ह्यातील डॉक्टर, अधिकारी, नर्स कर्मचारी जीवाची पर्वा न करता रुग्णांना सेवा देत आहेत. मात्र, नितेश राणे मुंबईत बसून प्रसिद्धीच्या हव्यासापोटी या सर्वांचे मनोधैर्य खच्ची करत आहेत. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी जिल्हा शल्यचिकित्सक धनंजय चाकूरकर हे जिल्ह्यात वेगवेगळ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत आहेत. जिल्हा रुग्णालयातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र उशिराने कोविडसाठी बेड दिलेल्या आपल्या खासगी हॉस्पिटलचा व्यवसाय वाढविण्यासाठी व राजकीय फायद्यासाठी नितेश राणे व त्यांचे भाजपचे सहकारी शासकीय आरोग्य व्यवस्थेची बदनामी करत आहेत काय? असा सवाल नाईक यांनी केला आहे.

ही बातमी पण वाचा : ‘ये अंदर की बात हैं…शरद पवार हमारे साथ हैं’, नितेश राणेंचा दावा

वैभव नाईक पुढे म्हणाले, जिल्हा रुग्णालयात रेमडेसिवीरसह सर्व प्रकारची आवश्यक औषधे उपलब्ध आहेत. लवकरच आणखी एक हजार इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत. टेस्ट संख्या वाढत आहे. स्वतःचा ऑक्सिजन प्लांट येणाऱ्या दोन दिवसांत सुरू होणार आहे. आरोग्य उपकेंद्रांमध्ये पहिल्यांदा ९१ बीएएमएस डॉक्टर उपलब्ध आहेत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका मंजूर करण्यात आल्या आहेत. ज्या ज्या अडचणी येत आहेत, त्या सोडविण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करत आहे. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीचा प्रश्न सोडविण्यात आलेला आहे, अशी माहितीही नाईक यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील सर्व मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये पहिल्या महिन्यापासूनच कोविड रुग्णांना सेवा सुरू करण्यात आली. मात्र, राणेंनी सहा महिन्यांनंतरही स्वत:चे रुग्णालय कोविडसाठी दिले नव्हते. राणेंच्या नाकर्तेपणाचा फटका त्यांच्या सुदन बांदिवडेकर या कार्यकर्त्याला बसला. राणे आपल्या कार्यकर्त्यांना व कर्मचाऱ्यांनाही आपल्या हॉस्पिटलचा आधार देऊ शकले नाहीत. जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी मोफत रुग्णसेवा दिली व काहींनी आपल्या रुग्णालयात कोविड-१९ च्या रुग्णांवर उपचार सुरू केले. त्यामुळे नाइलाजाने राणेंना आपल्या रुग्णालयातील काही बेड कोविडसाठी द्यावे लागले, असा आरोप नाईक यांनी केला आहे. ‘सुरुवातीपासून त्यांनी आपल्या रुग्णालयात कोविडचे उपचार सुरू केले असते तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ रुग्णांना मिळाला असता, असं सांगतनाच, ‘त्यांच्या रुग्णालयात किती जण उपचार घेत आहेत, किती रुग्ण बरे झाले हे नितेश राणेंनी जाहीर करावे.

आरटीपीसीआर लॅब वेळीदेखील राणेंनी असेच राजकारण केले. भाजपच्या आमदारांच्या निधीतून (अर्थात शासनाचे) पैसे घेऊन राणेंनी आपल्या रुग्णालयात कोविड-१९ लॅब सुरू केली. शासनाचे पैसे वापरूनसुद्धा राणे जिल्हावासीयांना कोविड टेस्ट मोफत देऊ शकलेले नाहीत. त्यातही आर्थिक व्यवहार त्यांनी सुरू ठेवला. त्यांच्या रुग्णालयात किती रुपये दिल्यावर कोविड टेस्ट केली जाते हेही त्यांनी जाहीर करावे.’ असे आव्हानच नाईक यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार असताना नारायण राणेंनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा न सुधारता स्वत:चे खासगी मेडिकल कॉलेज उभारले. मात्र, कोरोनाच्या महामारीत हे रुग्णालय रुग्णसेवेपासून अलिप्त ठेवण्यात आले. ही वस्तुस्थिती नितेश राणे स्वीकारणार आहेत का? असा प्रश्नही नाईक यांनी केला आहे.

नितेश राणे व त्यांचे भाजपचे सहकारी आपल्या पक्षाच्या गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना नेहमी भेटत असतात. गोवा राज्याने सिंधुदुर्गातील रुग्णांवर उपचार करणे बंद केले आहे. या रुग्णसेवेसाठी महाराष्ट्र सरकार गोवा सरकारला उपचाराचे पैसे वेळोवेळी देत होते. त्यामुळे नितेश राणेंनी आरोप करण्यापेक्षा गोवा रुग्णालयात सिंधुदुर्गमधील रुग्णांवर उपचार व्हावे यासाठी पाठपुरावा करावा, असा सल्लाही नाईक यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईस्थित चाकरमान्यांना मोठ्या संख्येने सिंधुदुर्ग व कोकणात न जाण्याचे आवाहन केले होते. मात्र, राणे व भाजपच्या मंडळींनी मुद्दाम लोकांना कोकणात येण्याचे आवाहन केले. त्यामुळे गेल्या काही दिवसांत मुंबई व जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात कोविड पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळं राणेंच्या टीकेकडे लक्ष न देता कोरोना रुग्णांनी वेळ न घालवता जिल्हा रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहनही नाईक यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER