राष्ट्रवादीच्या तत्कालीन उमेदवाराचा शिवसेनेला धक्का, शिवसेना आमदाराचे जात प्रमाणपत्र रद्द

Lata Sonawane

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघाच्या आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणेयांची (Latabai Sonawane) आमदारकी धोक्यात आली आहे. लताबाई सोनावणे यांचे टोकरे कोळी अनुसुचित जमातीचा उल्लेख असणारे प्रमाणपत्र नंदूरबारमधील प्रमाणपत्र तपासणी समितीने अवैध ठरवले आहे. माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी याबाबतची माहिती दिली. त्यामुळे शिवसेनेला (Shiv Sena) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने जळगाव जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

जळगावातील चोपडा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव होता. या ठिकाणाहून लताबाई चंद्रकांत सोनवणे या शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाल्या होत्या. तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी लताबाई यांच्या अनुसूचित जमातीचा दावा करणाऱ्या प्रमाणपत्राबद्दल उपसंचालक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबार यांच्याकडे आक्षेप घेतला होता. या तक्रारीनंतर समितीसमोर सुनावणी करण्यात आली. मात्र या समितीने काहीही निकाल न दिल्याने यांनी उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर उच्च न्यायलयाने संबंधित त्रिसदस्यीय समितीला लवकरात लवकर आदेश द्या, असे खडसावले होते.

त्यानुसार तपासणी समितीने बुधवारी याबाबत निकाल देत लताबाई चंद्रकांत सोनवणे यांचे अनूसुचित प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे. तसेच ते रद्द करण्यात येत असल्याचे नमूद केले आहे.

या निकालामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या निकालामुळे त्यांची आमदारकी रद्द होण्याची चर्चा सध्या रंगली आहे. दरम्यान या निकालाविरोधात औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार असल्याची माहिती सोनवणे यांच्या स्वीय सहाय्यक यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER