शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचा संयम सुटला, वयोवृद्ध माणसाला मारहाण

Bhaskar Jadhav.jpg

रत्नागिरी : शिवसेनेचे (Shivsena) आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांचा रत्नागिरीतील ग्रामदैवतेच्या मंदिरात संयम सुटल्याचं समोर आलं आहे. त्यांनी शारदादेवीच्या मंदिरात जोरदार गोंधळ घातला. तसेच एका वयोवृद्ध माणसाला शिवीगाळ करत मारहाण केली. याचा एक व्हिडीओ देखील सध्या व्हायरल होत आहे. हा सर्व प्रकार शारदा देवी मंदिर ट्रस्टच्या पदाधिकारी आणि ग्रामस्थ समिती यांच्या बैठकीदरम्यान झाला. त्यांचा हा व्हिडिओ टीव्ही-९ मराठीने प्रसारित केला आहे.

भास्कर जाधव यांच्या तुरंबव या मूळ गावी शारदा देवी मंदिर ट्रस्ट्रचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ कमिटी यांची बैठक सुरु होती. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या या बैठकीत भास्कर जाधव यांनी अचानकपणे येऊन गोंधल घातला. सुरुवातीला त्यांनी मंदिरातच शिव्यांची लाखोली वाहिली. यावेळी एका वयोवृद्ध नागरिकाने या प्रकाराचा मोबाईल व्हिडिओ केला. त्यावेळी भास्कर जाधव यांनी या ज्येष्ठ व्यक्तीलाही मारहाण केली.

भास्कर जाधव मंदिरातील बैठकीत शिव्या देतानाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद झाला आहे. तसेच मारहाणीचा व्हिडीओ सीसीटिव्हीत कैद झालाय. यासंदर्भातील कुठलीच तक्रार अद्याप नोंदवलेली नाही. संबंधित मारहाणीचा आणि शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ ६ ऑक्टोबरचा आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER