नाणार रिफायनरीच्या विरोधात शिवसेनेची १ मार्चला सभा

Uddhav

रत्नागिरी :- सध्या नाणार रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेनेत दुफळी माजली आहे. शिवसेनेचे अनेक पदाधिकारी रिफायनरीच्या समर्थनार्थ उघड भूमिका घेताना दिसत आहेत. काहींवर कारवाईदेखील शिवसेनेने केली आहे. मात्र शिवसेनेतीलच पदाधिकारी समर्थनार्थ पुढे येत असल्याने शिवसेना दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका होत आहे. त्यामुळेच शिवसेना पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी १ मार्च रोजी राजापूरमधील डोंगर इथं जाहीर सभा घेणार आहे. शिवसेनेची भूमिका बदललेली नसून रिफायनरीला विरोध किती आहे हे सभेच्या माध्यमातून शिवसेना दाखवून देणार असल्याची माहिती राजापूरचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी दिली आहे.

रिफायनरी प्रकल्पावरून काही स्थानिक शिवसेना नेते समर्थन करत आहेत. त्यावरून शिवसेनेवर दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका होत आहे. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील नाणार होणार नाही, अशी भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. पण तरीही शिवसेनेचे काही स्थानिक नेते, विभागप्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य नाणारचं समर्थन करत आहेत. त्यामुळे शिवसेनेची भूमिका काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

त्यामुळेच राजापूर तालुक्यातील डोंगर इथे १ मार्च रोजी सभा घेऊन शिवसेना रिफायनरीला विरोध किती आहे हे दाखवून देणार आहे. ९० टक्के लोकांचा विरोध आहे; मात्र समर्थक विरोध नसल्याचं दाखवत आहेत. त्यामुळे १ मार्चला ‘हा सूर्य हा जयद्रथ’ हे स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना पदाधिकारी तात्या सरवणकर यांनी दिली आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली ही सभा होणार असून, शिवसेना उपनेते तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी या सभेला उपस्थित राहणार आहेत. शिवसेना अद्यापदेखील आपल्या भूमिकेवर ठाम असून त्यात कोणताही बदल नाही हे यावेळी जाहीरपणे सांगितले जाणार आहे.

सीएए-एनआरसीविरोधात उद्धव ठाकरेंना ठराव मांडायला लावू : काँग्रेस