सत्तारांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत भडका; ‘हे’ नेते संतापले

Shivsena criticize abdul sattar

औरंगाबाद/मुंबई : औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत अध्यक्षपदावरून घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेतून अब्दुल सत्तार यांच्याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी, सत्तार यांची पुढील वाटचाल कठीण असल्याकडे सूत्रांनी लक्ष वेधले आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची माळ आज भाजपाच्या एल. जी. गायकवाड यांच्या गळ्यात पडली. भाजपाच्या गायकवाड यांना ३२, तर शिवसेनेच्या शुभांकी काजे यांना २८ मते मिळाली.

शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यामुळेच उपाध्यक्षपद शिवसेनेच्या हातून गेले. महाविकास आघाडीला अब्दुल सत्तारांच्या गटाचे मतदान मिळाले नाही, असा आरोप शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. सत्तार यांनी आज सकाळीच मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्याने वादळ निर्माण झाले होते, हे येथे उल्लेखनीय. दरम्यान, सत्तार यांच्याविषयी शिवसेनेत तीव्र असंतोष निर्माण झाला असून, सत्तार यांच्या राजीनाम्याबाबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांच्या हालचालींवर संताप व्यक्त केला.

माध्यमांशी बोलताना त्यांनी सत्तार यांचा एकेरी उल्लेख केला. त्याचवेळी, सत्तार राजीनामा देणार नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यापूर्वी, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही सत्तार हे मूळचे शिवसैनिक नसल्याने त्यांना शिवसेनेत रुळायला वेळ लागेल, असे वक्तव्य केले होते, हे येथे उल्लेखनीय. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी तर अब्दुल सत्तार हे ‘गद्दार’ असल्याचे वक्तव्य केले आहे.