बेळगावप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत शरद पवारांनी येडीयुरप्पांशी चर्चा करावी – संजय राऊत

मुंबई :- बेळगाव – बेळगाव प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शरद पवारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याशी चर्चा करावी, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याचेही म्हटले. बेळगावात ते पत्रकारांशी बोलत होते. ‘न्यायालयाच्या जो निकाल लागेल तो लागेल. मात्र सध्या दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होऊन या विषयावर चर्चा झाली पाहिजे. न्यायालयाचा जो निकाल लागेल त्याच्यात किती पिढ्या अजून जातील ते सांगता येत नाही. मी सतत सांगेन की, दोन मुख्यमंत्र्यांनीच या संदर्भात चर्चा करुन मार्ग काढावा’, असे संजय राऊत म्हणाले.

ही बातमी पण वाचा : इतिहासावर बोलू नका, बेरोजगारी आदिंवर बोला – आदित ठाकरेंचा संजय राऊतांना सल्ला

संजय राऊत म्हणाले, ‘महाराष्ट्रातही कानडी लोक राहतात. महाराष्ट्राने नेहमी त्यांना मदतच केली आहे. मात्र बेळगावमध्ये मराठी नाटकांवर अधिक कर लादण्याचा प्रकार होत आहे’, असा आरोपही त्यांनी केला. तसेच ‘मी येथून गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बेळगावची परिस्थिती आणि लोकांच्या भावना सांगेन. बेळगावचा विषय 14 वर्षांपासून न्यायप्रविष्ट आहे. तारखांवर तारखा पडत आहेत. आता एकदा प्रकरण न्यायालयात गेल्यावर त्याच्यावर राजकीय भाष्य करणे योग्य नाही. जसं राम मंदिराचा विषय असंख्य वर्षांनंतर न्यायालायतून सुटला. तसंच बेळगाव प्रश्नही न्यायालयाच्या माध्यमातून प्रश्न सुटावा. महाराष्ट्र सरकारने बेळगावचा खटला लढण्यासाठी हरिश साळवे यांची नियुक्ती केली आहे. ते जगातील सर्वोत्कृष्ट वकील आहेत. आता तर त्यांची ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणूनही नियुक्ती झाली आहे’, असे संजय राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, ठाकरे सरकारला पाठिंबा देणारा काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडावा म्हणून संजय राऊत दरदिवशी काँग्रेस अडचणीत येईल अशी वक्‍तव्ये बेतालपणे करीत आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लालाला भेटायला पायधुनीला यायच्या, असे वक्‍तव्य केले आणि मग माघार घेतली. याला 24 तास उलटत नाहीत तोच त्यांनी काल तारे तोडले की, सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यास विरोध करणार्‍या काँग्रेस नेत्यांना अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये दोन दिवसांसाठी पाठविले पाहिजे, असे म्हटले. त्यामुळे कॉंग्रेस नेते पुन्हा एकदा नाराज झाले आहेत.