एकनाथ खडसे भाजप सोडणार? शिवसेनेच्या बड्या नेत्याचे वक्तव्य

Eknath Khadse-Eknath Shinde

मुंबई : भाजप नेते एकनाथ खडसे पक्षावर नाराज असून वेळोवेळी त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे.यापार्श्वभूमीवर खडसे भाजपाला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे या सगळ्या घडामोडींवर शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाष्य केलं आहे.

एकनाथ खडसे आणि आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. एकनाथ खडसे हे नुकतेच शरद पवार यांना भेटले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे साहेबांबरोबर खडसे यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे कोणी कुठेही भेटू शकतो. ही लोकशाही आहे,’ असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी खडसेंच्या राजकीय हालचालींवर भाष्य केलं आहे. तसंच एकनाथ खडसे हे लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेऊ शकतात, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

आमच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधातील पुरावे पक्षाकडे सुपूर्द : एकनाथ खडसे

‘महाविकास आघाडीमध्ये तीन वेगवेगळे पक्ष आहेत. त्यांची चर्चा सुरू आहे. लवकरच खाते वाटप होईल. याबाबत उद्धव ठाकरे लवकरात लवकर निर्णय घेतील. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षाची महाविकास आघाडी झाली आहे. कॉमन मिनिमम प्रोग्राम आम्ही तयार केला आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी आम्ही चांगले काम करू. राज्यातील विकास प्रकल्पाला कुठेही स्थगिती दिलेली नाही. आढावा घेण्याचे काम सुरू आहे. आमचा विधानसभेतील 170 चा आकडा आहे. भविष्यात आणखी वाढेल,’ असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान खडसे यांनी काल दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या 6 जनपथ या निवासस्थानी भेट घेतली. तब्बल अर्धा तास झालेल्या या चर्चेनंतर दिल्लीत कुठल्याही भाजप नेत्याची भेट न घेता ते सरळ मुंबईला निघाले असून ते आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे भेट घेणार असल्याची माहिती आहे.