पुण्यात युवासेना नेत्याची निर्घृण हत्या, कसबा पेठेत तणाव

Deepak Maratkar

पुणे : राजकीय वैमनस्यातून शिवसेनेचे माजी दिवंगत नगरसेवक विजय मारटकर (Vijay Maratkar) यांचे सुपुत्र युवा सेनेचे कसबा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि नेता दीपक मारटकर (Deepak Maratkar) यांची हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या हत्येमुळे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला असून, सध्या कसबा पेठेत तणाव वाढला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री उशिरा ५ ते ६ हल्लेखोरांनी कोयता आणि चाकूने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दीपक मारटकर गंभीर जखमी देखील झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

दीपक विजय मारटकर हे मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास जेवण करुन घराबाहेर बसले होते. यावेळी मोटारसायकलवरुन ५ ते ६ जण आले. त्यांनी तीक्ष्ण हत्याराने दीपक यांच्यावर सपासप वार केले व पळून गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दीपक यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यु झाला.

दरम्यान आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हल्लेखोरांपर्यंत पोहोचता येईल का याचा तपास पोलीस करत आहेत. या हल्ल्याचं कारण अद्याप समजू शकलं नाही परंतु पुण्यातल्या कसबा मतदारसंघात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय वैमनस्यातून सुपारी देऊन त्यांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत दीपक मारटकर उभे होते़. त्यांच्याविरोधात अश्विनी कांबळे याही उभ्या होत्या. शिवसेनेतील एक नेते महेंद्र सराफ हेही तिकीट मिळविण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यांना शिवसेनेचे तिकीट मिळाले नाही. याबाबत सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांनी सांगितले की, राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले असून आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सनी कोलते व इतरांनी ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांना संशयितांची नावे समजली असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. इतर आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER