निवडणुकीपूर्वीच शिवसेनेला धक्का, माजी आमदार बाळासाहेब सानप उद्या भाजपात

Balasaheb sanap

नाशिक :- शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप हे शिवसेनेतच राहतील की भाजपात जातील या प्रश्नावर आता अखेर पडदा पडला आहे. ते उद्या सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुका आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सानप उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे

बाळासाहेब सानप उद्या दुपारी 12 वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईतील नरीमन पॉइंट येथील भाजप कार्यालयात हा पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे. बाळासाहेब सानप यांनी अवघ्या दोन वर्षात तीन पक्ष बदलले आहेत. आता चौथ्यांदा पुन्हा ते पक्ष बदलण्याच्या तयारीत आहे. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सानप यांचा फायदाच होऊ शकत असल्याने भाजपनेही सानप यांना पक्षात घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, दोन वर्षात तीन पक्ष बदलणाऱ्या नेत्याला पक्षात प्रवेश कशासाठी दिला जात आहे? असा सवाल भाजपच्या एका गटातून उपस्थित होत आहे.

सानप हे आज पक्षात येतील आणि महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा त्यांनी पक्ष बदलला तर? असा सवालही भाजपमधील या गटाकडून विचारला जात आहे. सानप यांना पक्षात घेऊ नये म्हणून भाजपमधील ही लॉबी सक्रिय झाली असून त्यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटून आपला विरोध दर्शविल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, थेट प्रदेश पातळीवरूनच सानप यांना पक्षप्रवेशाच्या पायघड्या घालण्यात आल्याने भाजप नाशिकमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

दुसरीकडे सानप यांना पक्षात ठेवण्यासाठी शिवसेनेनेही प्रयत्न सुरू केले आहेत. सानप यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांना पक्षात संघटनात्मक जबाबदारी देण्याबरोबरच महामंडळाचे आश्वासन देण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. मात्र, या आश्वासनावर सानप अजूनही समाधानी नसल्याचं सांगण्यात येतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER