शिवसेनेकडून पंकजा मुंडेंना पक्षप्रवेशाचं आमंत्रण, खासदारासह पदाधिकारी पक्षप्रमुखांशी भेटणार

hemant Patil & Pankaja Munde

नवी दिल्ली : माजी मंत्री, भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भाजपच्या (BJP) राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळाले खरे पण, अजूनही पंकजा मुंडेंना भाजपत जे स्थान मिळायला पाहिजे ते अद्याप मिळालेले नाही. सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पक्षबांधणीसाठी मराठावाड्यात सक्रिय झाले आहेत. ते एकटेच मराठवाड्यात बैठका घेत आहेत. परंतु, मराठवाड्यात पंकजा मुंडे यांची मोठी राजकीय ताकद असताना त्यांना पक्षबांधणीच्या कार्यक्रमापासून दूर का ठेवले जात आहे. त्यामुळे भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे. त्यातच आता पंकजा मुंडे यांना शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी शिवसेनेत येण्याचे आमंत्रण दिले आहे. हेमंत पाटलांसह शिवसेनेचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेऊन पंकजांना सेनेत बोलवण्यासाठी विनंती करणार आहेत.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये योग्य तो मान मिळतनसल्याचे दिसून येत आहे. पंकजा मुंडे शिवसेनेत आल्यास त्यांचा योग्य सन्मान केला जाईल. पंकजा मुंडे यांना शिवसेनेत घेण्यासाठी आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत. पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये आल्यास मराठवाड्यात शिवसेनेला मोठी ताकद मिळेल. असा विश्वास हेमंत पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना व्यक्त केला.

दरम्यान, पंकजा मुंडे यांना पक्षात अजूनही डावलले जात असल्यामुळे मराठवाड्यातील पक्षबांधणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकांना त्या उपस्थित राहत नसल्याची चर्चा होती. मात्र पंकजा मुंडे वैयक्तिक कारणांमुळे या बैठकांना उपस्थित राहिल्या नाहीत, अशी सारवासारव भाजप नेत्यांकडून सोमवारी करण्यात आली. मात्र, त्याचवेळी औरंगाबादमधील बैठकीला पंकजा मुंडे समर्थकांनी दांडी मारल्याने भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER