भाजपमध्ये सामील होणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदाराला शिवसेनेकडून मोठा झटका

BJP

सोलापूर : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुक होणार असून, त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील अनेक मातब्बर नेते सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करतांना दिसून येत आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे संजयमामा शिंदे यांनी नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने शिंदे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार, हे आता जवळपास निश्चित झालं आहे. पण भाजप प्रवेशाच्या तयारीत असेल्या आमदार शिंदे यांना जोरदार धक्का बसला आहे.

मागील २५ वर्षे सत्तेवर राहिलेले आमदार बबनराव शिंदे सत्तेविना बेचैन झाले आहेत. राज्यात आणि केंद्रात महायुतीचे वारे वाहत आहे. त्यामुळे ते अडचणीच्या काळात भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र विधानसभेला ते भाजपकडून उभे राहिले तरी त्यांना पराभूत करू, असा इशारा युतीत सामील असलेल्या शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत यांनी दिला आहे.

ही बातमी पण वाचा : ‘दिल्लीत उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाची तयारी…: मुख्यमंत्र्यांकडून तारखेची वाट

माढा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेच्या नेत्यांनी आमदार बबनराव शिंदेंवर जोरदार ताशेरे ओढले. ‘माढा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आम्ही आमचा गड कुठल्याही परिस्थितीत भाजपसाठी सोडणार नाही. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनाही याची कल्पना देण्यासाठीच हा मेळावा घेतला आहे. आमदार शिंदे यांना पायउतार करण्याची हीच वेळ आहे. शिवसेना जिवंत ठेवण्याचे काम आम्ही सतत केले आहे. आम्हाला अपयश आले तरीही घराघरात शिवसेना पोहोचवण्याचे काम केले. लोकसभा निवडणुकीत एकजुटीने काम करून राष्ट्रवादीला खिंडार पाडले आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभेत लोकसभेप्रमाणे विधानसभेतही पुनरावृत्ती घडवून शिंदेंना पराभव चाखायला लावण्याची हीच वेळ आहे,’ असं म्हणत शिवसेनेच्या प्रा. शिवाजी सावंत यांनी कोणत्याही परिस्थितीत शिंदेंचा पराभव करण्याचा निर्धार केला आहे.