शेकापच्या गडात आता युतीची स्थिती भक्कम

सुंदर समुद्रकिनारा लाभलेल्या रायगड जिल्ह्यावर एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचे एकहाती वर्चस्व होते. तथापि, ते हळुहळु कमी होत गेले. यावेळी शेकापच्या अस्तित्वाची लढाई असेल. रायगड जिल्ह्यात विधानसभेचे सात मतदारसंघ असून त्यापैकी तीन उरण, पनवेल आणि महाड हे तीन मतदारसंघ आहेत तर आघाडीकडे अलिबाग, पेण, कर्जत आणि श्रीवर्धन असे चार मतदारसंघ आहेत. खा.सुनील तटकरे यांच्यामुळे राष्ट्रवादीनेही गेल्याकाही वर्षांत या जिल्ह्यात भक्कम पाय रोवले. मात्र, काही दिवसांपूर्वी तटकरे यांचे पुतणे व श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे, त्यांचे वडील आणि माजी विधान परिषद सदस्य अनिल तटकरे शिवसेनेत गेल्याने युतीला आणि विशेषत: शिवसेनेला बळ मिळाले आहे.

श्रीवर्धनमध्ये शिवसेना अवधूत तटकरे यांना उमेदवारी देईल हे जवळपास निश्चित आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अदिती तटकरे त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून लढू शकतात. त्या खा.सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे अनंत गीते यांचा ४० हजारावर मतांनी पराभव केला होता.

महाड मतदारसंघात शिवसेनेचे भरतशेठ गोगावले विरुद्ध काँग्रेसचे माणिक जगताप असा सामना होईल. अलीबाग हा शेकापचा बालेकिल्ला. तेथे विद्यमान आमदार शेकापचे पंडित पाटील यांना पुन्हा संधी मिळणार की शेकापचे दिग्गज नेते आणि विधान परिषदेचे सदस्य जयंत पाटील यांच्या सून चित्रलेखा पाटील यांना रिंगणात उतरवणार या बाबत कमालीची उत्सुकता आहे. २०१४ मध्ये या ठिकाणी पंडित पाटील यांनी शिवसेनेचे महेंद्र दळवी यांचा १६ हजारावर मतांनी पराभव केला होता. तसेच लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेने जवळपास बरोबरीत मते घेतली होती.

पनवेलमध्ये भाजपचे जबरदस्त वर्चस्व आहे ते प्रशांत ठाकूर यांच्यामुळे. आमदारकीची हॅटट्रीक केल्यानंतर आता ते चवथ्यांदा रिंगणात असतील. आघाडीकडनू या मतदारसंघात प्रीतम म्हात्रे, काशीनाथ पाटील, रवि पाटील, कांतिलाल कडू अशी नावे चर्चेत आहेत. प्रशांत आणि त्यांचे वडील माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे प्राबल्य असलेला हा मतदासंघ आहे. बाजूच्या उरणमध्ये शिवसेनेचे मनोहर भोईर आमदार आहेत. शेकापचे माजी आमदार विवेक पाटील विरुद्ध भोईर असा सामना पुन्हा या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी विवेक पाटील ८११ पराभूत झाल्याने शेकापला मोठा धक्का बसला होता. भाजपने हा मतरदारसंघ उरणचे नेते महेश बालदी यांच्यासाठी सुटावा म्हणून जोर लावला आहे. कर्जतमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना रंगेल. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुरेश लाड हेच पुन्हा उमेदवार असतील. त्यांच्याविरोधात माजी आमदार देवेंद्र साटम, महेंद्र थोरवे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे आदी इच्छुक आहेत.

जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये शेकप लढल्यास तिन्ही पक्षांचा फायदा होईल. गेल्या वेळी वेगवेगळे घडलेले भाजप व शिवसेना या वेळी एकत्र असल्याने युतीच्या जागा निश्चितपणे वाढतील.

या निवडणुकीच्या निमित्ताने रिंगणात नसलेल्या काही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यात खा.सुनील तटकरे, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, शेकापचे सर्वेसर्वा जयंत पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर आदींचा समावेश आहे.