शिवसेनेकडून शहिदाच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, कुटुंबासोबत असल्याची ग्वाही

Eknath Shinde - Gadchiroli Flood

गडचिरोली : घात लावून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस जवान जवान दुशांत नंदेश्वर यांच्या कुटुंबीयांना शिवसेनेकडून (Shiv Sena) पाच लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गडचिरोलीत जाऊन दुशांत यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. आणि आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला.

गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात पुरामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. गडचिरोलीतील पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर त्यांनी कोठी भामरागड येथील शहीद झालेले जवान दुशांत नंदेश्वर यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शहीद जवानाच्या प्रतिमेस आदरांजली वाहून कुटुंबीयांना दिलासा दिला. कुटुंबाशी संवाद साधत असताना शासन आपल्या कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचंही त्यांनी दुशांत यांच्या कुटुंबीयांना सांगितलं. यावेळी त्यांनी दुशांत यांच्या कुटुंबीयांना शिवसेना पक्षाच्यावतीने पाच लाख रुपयांची मदत सुपूर्द केली. तसेच शासनाकडून मिळणारी मदत लवकरात लवकर देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, शिंदे यांनी गडचिरोली जिल्हयातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल तातडीने जिल्ह्याला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रशासनाला झालेल्या नूकसानाचे पूर ओसरल्यानंतर तातडीने पंचनामे करुन नागरिकांना आवश्यक मदत देण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी, अशी सूचना केली. आढावा बैठकीआधी कनेरी, पारडी या भागात जाऊन त्यांनी पूरग्रस्तांची भेट घेतली. तसेच पूरस्थितीची पाहणी केली. पारडी येथील शाळेतील निवारागृहाला भेट देवून पुरग्रस्तांबरोबर मिळत असलेल्या सोयी सुविधांबाबत विचारणा केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER