उद्धव ठाकरेंचा शिवसंवाद यात्रेतुन अकोल्यातील शेतकऱ्यांशी संवाद

अकोला : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी- काँग्रेसच्या संघर्ष यात्रेनंतर आता शिवसेनेने ही शेतकऱ्यांसाठी शिवसंवाद यात्रा काढली आहे. आज ( सोमवार) सेनेची शिवसंवाद यात्रा विदर्भातील अकोल्यात पोहोचली असुन या यात्रेच्या निमित्याने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अकोल्यातील शासकीय विश्रामगृहात बुलडाणा, अमरावतीच्या शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी जमलेल्या शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरें पुढे पोळ्या समस्यांचा पाढाच वाचला. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शक्यतो सर्व प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच आम्ही सत्तेत असू अथवा नसू, तरी कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी राहू असं ही उद्धव ठाकरे म्हणालेत.

उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांनी आवाहन केले,’ तुम्ही सत्तेतुन बाहेर पडा. तरच, या भाजपवाल्यांची झोप उडेल. त्यासाठी आम्ही शेतकरी तुमच्यासोबत आहोत.याप्रसंगी खासदार अरविंद सावंत, ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान,’ येत्या १९ मे ला उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांच्या त्यांच्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ तयार करुन देणार आहेत.