शिवराजसिंह चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदी

Shivraj Singh Chouhan Sworn In As Madhya Pradesh CM

भोपाल :- कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर आणि समर्थकांच्याही राजीनाम्यानंतर मध्यप्रदेशात कमळ फुलणार हे अटळ झाले होते. त्याप्रमाणे देश कोरोनाच्या भीताने घरात बसून असताना आजची मध्यप्रदेशातील संध्याकाळ मात्र भाजपात उत्साह निर्माण करणारी ठरली. मध्यप्रदेशात अनेक नाट्यमय घडामोडींनंतर भाजपानं अखेर आपलं सरकार स्थापन केलं आहे. भाजपाचे राज्यातील वरिष्ठ नेते शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी रात्री ९ वाजता राजभवन येथे राज्यपालांकडून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अवघ्या १८ महिन्यांत ते पुन्हा मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले आहेत. शिवराजसिंह चौहान चौथ्यांदा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणार आहेत.

तत्पूर्वी, शिवराजसिंह चौहान यांची सोमवारी भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीत पर्यवेक्षक बनवण्यात आलेले भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मध्यप्रदेशचे प्रभारी विनय सहस्रबुद्धे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला रामराम करीत भाजपात प्रवेश केल्याने त्यांच्या २२ समर्थकांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे काँग्रेसचे कमलनाथ सरकार अल्पमतात आले होते.

त्यानंतर २२ मार्च रोजी कमलनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तर दुसरीकडे भाजपाची सदस्यसंख्या वाढल्याने सरकार बनवण्यासाठी आवश्यक संख्याबळ असल्याने भाजपाचे सरकार बनणार हे निश्चित झाले होते. नवे सरकार स्थापन होईपर्यंत राज्यपालांनी कमलनाथ यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्र्याची जबाबदारी सोपवली होती.