अमिताभ बच्चन वर शिवप्रेमी नाराज

Amitabh Bachchan

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे. सध्या तुफान लोकप्रियता मिळवत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती-११’ या टीव्ही शोचे सूत्रसंचालन अमिताभ करत आहेत. एका प्रश्नाच्या उत्तरांच्या पर्यायात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता.

त्यावेळी समोर स्पर्धकाला तो पर्याय सांगताना अमिताभ यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला. यामुळे लोकांमध्ये नाराजी पसरली असून अमिताभ यांनी याबाबत माफी मागावी अशी मागणी होत आहे. अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत त्यांचा अपमान केल्याचे म्हणत शिवप्रेमींनी अमिताभ बच्चन यांना जाब विचारत त्यांच्यावर ताशेरे ओढले. कौन बनेगा करोडपती च्या मागील शोमध्ये स्पर्धकाला मुघल बादशाह औरंगजेब बाबत प्रश्न विचारण्यात आला.

मुघल बादशाह औरंगजेब याच्या समकालीन खालीलपैकी कोण होते? असा प्रश्न स्पर्धकासाठी स्क्रीनवर आला. या प्रश्नाचे ४ पर्याय देण्यात आले होते. त्या ४ पर्यायांमध्ये महाराणा प्रताप, राणा सांगा, महाराजा रणजीत सिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज असे पर्याय देण्यात आले होते. डी या पर्यायात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता. अमिताभ यांनी देखील पर्याय सांगताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरीच उल्लेख केला. विशेष म्हणजे प्रश्नात औरंगजेब याचा सम्राट असा उल्लेख करण्यात आला होता. यामुळे लोकांमध्ये नाराजी पसरली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेले महाराष्ट्रातील शिवप्रेमी अतिशय नाराज झाले आहेत. याचे तिव्र पडसाद सोशल मीडियावर उमटले दिसले. मुघल बादशाह औरंगजेब का उल्लेख सम्राट असा सन्मानपूर्वक केला असताना, तसेच इतरही शासकांचा उल्लेख आदराने केला असताना, छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख मात्र एकेरी करण्यात आल्याने शिवप्रेमी अधिक नाराज झाले आहेत. यामुळे कौन बनेगा करोड़पति या टीवी शो बाबत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.