शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची प्रकृती उत्तम, समाधी घेण्याची निव्वळ अफवा

Shivling Shivacharya Maharaj

नांदेड : डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज (Shivling Shivacharya Maharaj) यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती त्यांच्या आश्रमाकडून अधिकृतपणे देण्यात आली आहे. सध्या त्यांच्यावर नांदेडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून, शुक्रवारी (२८ ऑगस्ट) त्यांच्या जिवंत समाधीच्या अफवेनंतर त्यांच्या अहमदपूर येथील आश्रमात कोरोना (Corona) संसर्गाचा धोका असतानाही मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. आता त्यांच्या भक्तांनी शिवाचार्य महाराज सदेह समाधी घेण्याची अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शुक्रवारी डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज समाधी घेणार असल्याच्या अफवेतून भक्तांची मोठी गर्दी बघायला मिळाली होती. यानंतर त्यांच्या आश्रमाकडून शिवाचार्य महाराज समाधी घेणार नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं. मात्र, तोपर्यंत त्यांच्या लातूरमधील आश्रम परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या गर्दीने शारीरिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते. त्यामुळे कोरोना संसर्गाची भीतीही वाढली.

लातुरात आतापर्यंत ७ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचा तर फज्जा उडालाच मात्र, काही भक्तांनी मास्क न लावल्याने काहीशी काळजी व्यक्त केली जात होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता बाजूला सारुन भक्तांनी गर्दी केल्याने आरोग्याचा मोठा प्रश्न तयार झाला होता. आता मात्र भक्तांनी महाराजांच्या समाधीच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

डॉ. शिवलिंग शिवाचार्य हे लिंगायत समाजाचे धर्मगुरु आहेत. फक्त महाराष्ट्रातच नव्हते, तर राज्याबाहेरही शिवाचार्य महाराज यांना मानणारा मोठा वर्ग आहे. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे वय १०४ वर्षे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER