ठाण्यात रंगला शिवभूषण पुरस्कार सोहळा

ठाणे मराठा क्रांती मोर्चा आयोजित शिवजयंती

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ स्वराज्याचा स्थापना केली नाही तर स्वराज्य सुजालाम, सुफलाम करण्यासाठी विविध क्षेत्रात आघाडी घेतली होती. त्यांच्या शौर्य, व्यवस्थापन कौशल्यातून धडा घेत आजही समाजात अनेक मावळे काम करीत आहेत. त्यापैकी निवडक रत्नांना ठाणे सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात शिवभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यंदा या पुरस्काराचे सावंतवाडीतील श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अच्युत सावंत-भोसले, अभियंते संजय देशमुख, डॉ. संदीप माने आणि उद्योजक प्रशांत सकपाळ हे मानकरी ठरले.

गेल्या तीन वर्षांपासून मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजाच्या वतीने मासुंदा तलावाजवळील जांभळी नाका येथील शिवाजी मैदानात मोठ्या थाटा शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षीपासून छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण प्रत्यक्षात उतरवून समाजाच्या विविध घटकांमध्ये अतुलनीय काम करीत आहेत, अशा मावळांना शिवभूषण पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज मैदानात स्वराज्यातील गड -किल्ल्यांचे वैभव साकारण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला रायगड, कोरीगड, सिंधुदुर्ग, जन्मस्थळ शिवनेरी, लोहगड, पद्मदुर्ग, ,सिंहगड, सुवर्णदुर्ग, रामशेज, प्रतापगडाची प्रतिकृती या मैदानात साकारण्यात आल्या. शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन यानिमित्ताने भरविण्यात आले होते. महाराजांची भव्य रांगोळीने ठाणेकरांचे लक्ष वेधले होते.

जिद्द शाळेतील शिवकालीन पेहराव केलेल्या मुलांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घघाटन करण्यात आले. मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन करुन मासुंदा तलाव परिसरात ढोल – ताशा पथक, लेझीम, मर्दानी खेळ, ऐतिहासिक वेशभूषा अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीची सुरूवात माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नारळ वाढवून केली. यावेळी माजी मंत्री आमदार रविंद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरेस शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष रमेश आंब्रे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर पोवडे, नाट्यगीत साजर करण्यात आले. त्यावेळी शिवप्रेमीने संपूर्ण मैदान फुलून गेले होते.

त्या ऐतिहासिक वातावरणात ठाणे महापालिकेतील माजी नगरअभियंता अनिल पाटील आणि मंत्रालयातील उपसचिव बाबुराव साळुंके यांच्या हस्ते चार रत्नांना शिवभूषण पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. सावंतवाडी सारख्या लहान शहरात पाच महाविद्यालये उभारून शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे आणि सावंत राजघरणाचे वशंज अच्युत सावंत भोसले, ठाणे शहराच्या विकासात मोलाची भूमिका बजावणारे इंजिनअर संजय देशमुख, लंडनमधील प्रॅक्टीस सोडून ठाण्यात दवाखाना थाटून रुग्णांची सेवा करणारे डॉ. संदीप माने आणि प्रशांत कॉर्नरचे मालक प्रशांत सपकाळ यांना पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी व्यासपिठावर उपमहापौर पल्लवी कदम, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रमेश आंब्रे, सचिव अ‍ॅड. संतोष सुर्यराव, खजिनदार धनंजय समुद्रे, परिवहन समितीचे प्रभारी सभापती राजेंद्र महाडीक, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश मोरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप शिंदे यांनी केले. दरम्यान खासदार राजन विचारे यांच्यासह अनेक नगरसेवक, पोलीस अधिकारी, विविध संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी सोहळ्याला भेट देऊन महाराजांना वंदन केले.

ठाणे : विज्ञान पार्क आणि शहरी जंगल उभारण्याच्या प्रकल्पाला स्थगिती